आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाला दिलासा:अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्याची 10 हजार कोटी मदत; हेक्टरी 10 हजार रुपये, 2 हेक्टरची मर्यादा

मुंबई6 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मराठवाड्याला मिळणार ३७६४ कोटी रु. चा निधी

यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक पिके पाण्याखाली गेली. यामुळे अस्वस्थ झालेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारने बुधवारी १० हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील संततधार, पूर आणि अतिवृष्टीमुळे एकीकडे शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यास राज्य सरकारकडून होणारा विलंब नाराजीचे कारण ठरला होता. मात्र, आता मदतीच्या पॅकेजची घोषणा झाल्यामुळे या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. ही आर्थिक मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जागोजाग पूर व शेतीमध्ये पाणी साचले. यामुळे सुमारे ५५ लाख हेक्टरवर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसाहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

मंत्रिमंडळाचे इतर निर्णय
बिगर नेट-सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीचे लाभ

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना निवृत्तिवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. जे अध्यापक २३ ऑक्टोबर १९९२ ते ३ एप्रिल २००० या कालावधीत नियुक्त होते अशांना हे निवृत्तिवेतन देण्यात येईल. शासन निर्णय १८ ऑक्टोबर २००१ व २७ जून २०१३ नुसार उपरोक्त कालावधीतील बिगर नेट -सेट अध्यापकांच्या सेवा सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरू ठेवण्यात आल्या असल्याने त्यांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक गृहीत धरून सेवानिवृत्तिवेतन देण्यात येईल.

कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार, संस्थांना अर्थसाहाय्य
कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक कुचंबणा झाली असून त्यांना आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. {मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आली.

मराठवाडा क्षेत्र

 • शेतकरी संख्या : ४७७४४८९
 • एकूण बाधित क्षेत्र : ३६५२८७२ हे.
 • जिरायती क्षेत्र : ३५३४३७१ हेक्टर
 • मदत लागेल : ३५३४ कोटी ३७ लाख १० हजार रुपये
 • बागायत क्षेत्र ६८३९१ हेक्टर
 • मदत लागेल : १०२ कोटी ५८ लाख ६५ हजार रुपये
 • फळ पिके : ५०१०९ हेक्टर
 • मदत लागेल : १२५ कोटी २७ लाख २५ हजार
 • एकूण - ३७६१ कोटी

मराठवाड्याला मिळणार ३७६४ कोटी रु. चा निधी
औरंगाबाद | राज्य सरकारने मराठवाड्याला घोषित केलेल्या मदतीनुसार मराठवाड्याला ३७०० कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी दिली. मराठवाड्यात ३६ लाख ५२ हजार ८७२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यानुसार एनडीआरएफच्या निकषानुसार २५८५ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र हेक्टरी जिरायतीसाठी १० हजार रुपये आणि इतर वाढीव मदतीच्या घोषणेमुळे ही रक्कम १२०० कोटी रुपयांनी वाढली आहे.

अशी असेल मदत

 • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत मदत करण्यात येईल.
 • जिरायतीसाठी प्रतिहेक्टर १० हजार रुपये, बागायतीसाठी प्रतिहेक्टर १५ हजार रुपये.
 • बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...