आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये महिलेवर बलात्कार करुन क्रूर कृत्य केल्याचे समोर आले होते. आज या पीडीतेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यभरातून या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान विरोधकांकडून देखील या प्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे. यासोबतच राज्य सरकारवरही निशाणा साधला जात आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत विरोधकांना याबाबत राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे.
या प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मुंबईमध्ये महिलांना सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातल्या सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये मुंबईचे नाव येते. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. मात्र काल जेव्हा ही साकिनाकामध्ये ही घटना घडली त्यातील आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हा कायदा आणि सुव्यवस्थेचाच प्रश्न आहे. मात्र या सगळ्या विषयाचे राजकारण करु नये. गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचे राजकारण यामध्ये केले जाऊ नये. कारण या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात.' असेही राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालला पाहिजे. तसेच विरोधी पक्ष हे सरकारवर आरोप करत आहेत. त्यांनी भूमिका मांडायला हवी. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी या घटनेचा निषेध केला आहे. यासारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारला अधिक कठोर पावले उचलावी लागणार आहेत आणि ती उचलल्याशिवाय राहणार नाही' असेही राऊत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.