आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:रेल्वे स्टेशन परिसरात खंडणी आणि हफ्तावसुली करून अमाप संपत्ती जमवलेल्या गुन्हेगाराला पोलिसांकडून अटक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खंडणी आणि हफ्तेवसुली करून जमवली 3 कोटींची संपत्ती तर पत्नीचे नावे तब्बल 9 घरे

मुंबईतल्या रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी आणि हप्तावसुली करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारांसह लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता खंडणी वसूल करून अमाप संपत्ती जमवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामध्ये आतापर्यंत 3 कोटी पेक्षा जास्त संपत्ती आढळून आली आहे. ज्यामध्ये त्याच्या पत्नीच्या नावावर जवळपास 9 घरे आणि अमाप सोने खरेदी केल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

दादर लोहमार्ग पोलिसांत एका फेरीवाल्याने एक व्यक्ती खंडणी वसूल करत असल्याची तक्रार दिली होती. यानुसार पोलिसांनी तपास केला आणि संतोषकुमार रामप्रताप सिंग उर्फ बबलू ठाकूर या सराईत गुन्हेगाराला त्याच्या पत्नीसह एकूण 6 आरोपींना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे बबलू ठाकूर याच्यावर मुंबई शहरात गंभीर स्वरूपाचे एकूण 25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

मुख्य बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे सबंध हे एका राजकीय पक्षाशी असल्याचे ते सांगत आहेत. त्यातल्या दोन आरोपीकडून पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यात एका राजकीय पक्षाची लेटरहेड मिळून आली आहेत. हे लोक खरोखर पक्षाशी संबंधित आहेत का याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. मात्र आरोपींनी वंचित बहुजन आघाडीच्या लेटरहेडचा वापर करून रेल्वे आयुक्तांना पत्र लिहिले होते. यात पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तो मागे घ्या अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन करू असा इशारा देखील दिला होता. आरोपी संजय मोहिते याने रेल्वे आयुक्तांना हे पत्र लिहिले होते. ज्यामध्ये त्याच पद पक्षात जनरल सेक्रेटरी असल्याचे लिहिले होते. हे फक्त खंडणीच प्रकरण नसून आणखी गंभीर प्रकार यामध्ये स्पष्ट होतील असा पोलिसांचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...