आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबै बँक घोटाळा:भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस, बोगस मजूरप्रकरणी उद्या पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवत 4 एप्रिल रोजी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. स्वत:ला मजूर दाखवत मुंबै बँकेच्या संचालकपदी बेकायदा निवडून येत कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याचप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

नेमके काय आहेत आरोप?
भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर मजूर या प्रवर्गातून संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. प्रवीण दरेकर नेमकी कुठे मजुरी करतात, असा सवाल करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकरांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहकार विभागानेही प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले होते. त्यामुळे दरेकर यांना संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, प्रवीण दरेकर तब्बल 20 वर्षे संचालकपदावर होते. म्हणून त्यांनी सरकारची तब्बल 20 वर्षे फसवणूक केली, असा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे.

अटकेपासून संरक्षण
दरम्यान, बोगस मजूरप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केल्यास अटकपूर्व जामिनासाठी प्रवीण दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जामिनावर 29 मार्च रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे दरेकरांच्या वकिलांनी पुढील सुनावणीपर्यंत दिलासा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीपर्यंत प्रवीण दरेकरांना याप्रकरणात अटक करू नये, असे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

वेगाने कारवाई होणार?
एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात ईडीचे धाडसत्र सुरू असताना गृह विभागाकडून भाजप नेत्यांविरोधात काहीही कारवाई होत नसल्याने मुख्यमंत्री नाराज असल्याचे बोलले जात आहे. याची तक्रार त्यांनी शरद पवारांकडेही केली असून तुम्हाला दृश्य परिणाम दिसतील, अशा शब्द पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधातदेखील आता गतिमान कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...