आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरारमध्ये अग्न‍िकांड:14 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू; प्राणवायू प्राणघातक ठरल्यानंतर, गारव्याच्या झळांनी कळवळला महाराष्ट्र

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला विजय वल्लभ रुग्णालयातील हाच तो आयसीयू कक्ष. कक्षातील प्रत्येक वस्तूची अक्षरश: राखरांगोळी झाली होती.

शुक्रवारी पहाटे विरारमधील विजय वल्लभ या खासगी रुग्णालयात अायसीयूमध्ये एसीचा प्रचंड स्फोट होऊन लागलेल्या भयंकर अागीमध्ये १४ कोरोना रुग्णांचा अक्षरश: होरपळून मृत्यू झाला. नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेला ४८ तास उलटत नाही तोच हे अग्निकांड घडल्याने अवघा महाराष्ट्र हळहळला. कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केले असतानाच महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरूच अाहे. विरार शहरातील मध्यवस्तीत असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या चार मजल्यांपैकी दुसऱ्या मजल्यावर अतीव दक्षता विभाग (आयसीयू) युनिट असून या ठिकाणी १८ कोरोना रुग्ण उपचार घेत होते. पहाटे ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास आयसीयू कक्षाच्या वातानुकूलित यंत्रणेत मोठा स्फोट झाला.

त्यापाठोपाठ आगीचे लोळ आयसीयू कक्षात घुसले. झपाट्याने पसरलेल्या आगीने संपूर्ण आयसीयू कक्षाला घेरले. आगीच्या लाेळांनी फर्निचर, बेड्स घेरले. यात गंभीर १३ कोरोना रुग्णांना उठणेही मुश्किल होते ते गुदमरले, होरपळले. मृतांमध्ये ५ महिला आणि ९ पुरुषांचा समावेश आहे. आयसीयूच्या छपराचे तुकडेही काही ठिकाणी पडले. आगीचे रौद्र स्वरूप पाहून रुग्णालयातील नातेवाईक “वाचवा वाचवा’ म्हणून अोरडत होते, तर ५ रुग्ण जिवाच्या अाकांताने धावत बाहेर पडल्याने ते बचावले. सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी आग नियंत्रणात आली. सुदैवाने आग इतर मजल्यांवर पसरली नाही. त्यामुळे रुग्णालयातील इतर रुग्ण सुखरूप आहेत. आग लागली त्या वेळी रुग्णालयाचा कर्मचारी वर्गही आयसीयूत नव्हता, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. अतिव दक्षता विभागाच्या कक्षातील एसीचा स्फोट झाल्याने दुर्घटना घडल्याचे विरार अापत्कालीन नियंत्रण कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त करून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले.मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपये तर गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहिर केली अाहे.

८० टक्के भाजलेल्या एकाचा दुसऱ्या रुग्णालयात मृत्यू
आगीत शिवाजी वीरकर हा रुग्ण ८० टक्के भाजला होता.त्याला जनसेवा रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्याठिकाणी व्हेंटिलेटर नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात अाले परंतु तिथे डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला मृत घोषित केले. दरम्यान,उपचार घेत असलेल्या इतर सर्व रुग्णांना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.

मृतांची नावे : निलेश भोईर, पुखराज वैष्णव, रजनी कडू, नरेंद्र शिंदे, कुमार दोशी, उमा कंगुटकर, जनार्दन म्हात्रे, रमेश उपायान, प्रवीण गौड़, अमेय राऊत, शमा म्हात्रे, सुवर्णा पितले, सुप्रिया देशमुख, शिवाजी वीरकर

शासकीय रुग्णालयांचे‘सेफ्टी ऑडिट’ महिनाभरात शक्य
भंडारा, मुंबई, नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांत पाठोपाठ घडलेल्या दुर्घटनांमुळे एकुणातच रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ आणि ‘सेफ्टी ऑडिट’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या कोविड काळात सर्वच रुग्णालयांवर असलेला कामाचा प्रचंड ताण पाहता शासन मान्यताप्राप्त सुरक्षा लेखापरीक्षकांचा उपयोग करून घेतल्यास राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे ‘सेफ्टी ऑडिट’ महिनाभराच्या कालावधीत पूर्ण होऊ शकते, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

राज्य सरकारच्या वतीने २०१७ मध्ये सुरक्षा लेखापरीक्षकांसाठी विशिष्ट पात्रता व अर्हता निश्चित केली असून असे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. या कृतीमागे औद्योगिक सुरक्षा हा प्रमुख उद्देश होता. त्यानुसार परीक्षा पद्धतीने सुरक्षा लेखापरीक्षकांना मान्यता दिली गेली. आजमितीस राज्यात असे ७४ मान्यताप्राप्त सुरक्षा लेखापरीक्षक आहेत. त्यांच्याकरवी मुख्यत्वेकरून औद्योगिक सुरक्षेचे लेखापरीक्षण केले जाते. त्यात प्रामुख्याने फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट यांचा समावेश आहे. तसेच याच्याशी संबंधित कायदेशीर बाबींची पूर्तता आहे की उर्वरित पान ३

नातेवाइकांचा विलाप
कोरोनामुळे आधीच िचंतेत असलेल्या नातेवाइकांना रुग्णालयातील अग्नितांडवामुळे धक्का बसला. कुणाची मुलगी, तर कुणाची पत्नी, आई या ठिकाणी उपचार घेत होते. आपल्या डोळ्यांसमक्ष आप्तस्वकीयांच्या मृत्यूने सुरू असलेला नातेवाइकांचा विलाप हृदय पिळवटून टाकणारा होता.

आईला कुठे शोधू? महिला डॉक्टरचा सवाल
एका महिला डॉक्टरच्या आईचाही या आगीत मृत्यू झाला. ती म्हणाली, चांगले उपचार मिळतील म्हणून स्वत:च आईला या ठिकाणी भरती केले होते. कोरोनातून ती बरी होत आली होती. मी दुसऱ्या मजल्यावर गेले त्या वेळी काही जळालेले मृतदेह मला दिसले. आता मी आईला कुठे शोधू, असा आर्त सवाल केला.

रुग्णालयाचे कर्मचारी गाढ झोपेत
आयसीयू कक्षात खरे तर रात्रभर डोळ्यात तेल घालून रुग्णांची काळजी घेतली जाते. परंतु या ठिकाणी आग लागली तेव्हा रुग्णालयाचे कर्मचारी चक्क गाढ झोपेत होते. कोरोना रुग्णांना बाहेर काढण्यासाठी एकही कर्मचारी मदतीला आला नाही, असा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला.

हे आहेत जबाबदार
वसई-विरार महापालिका आयुक्त डी. गंगाथरन आणि वल्लभ रुग्णालयाचे सीईओ डाॅ. दिलीप शहा यांच्या चुकीच्या कारभारामुळे विजय वल्लभ रुग्णालयात शुक्रवारी १६ कोविड रुग्णांना आग दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप बळींच्या नातलगांनी केला आहे. वसई-विरारमधील रुग्णालये म्हणजे निव्वळ कोंडवाडे असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. विशेष म्हणजे नगरविकास विभागाने नेमलेल्या चाैकशी समितीमध्ये मनपा अायुक्तांचाच समावेश असल्याने ही समिती नक्की कुणाची चाैकशी करणार, असा प्रश्न पडला अाहे. तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांमार्फत

गृह विभाग चौकशी करणार
या दुर्घटनेची पोलिस महासंचालकांमार्फत व त्यांच्या देखरेखीखाली सखोल चौकशी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...