आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेना व राष्ट्रवादी या सत्ताधारी महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्षांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मात्र या निवडणुका स्वतंत्र लढण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मंगळवारी बैठक झाली. त्यामध्ये स्थानिक परिस्थिती पाहून आघाडी करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे धोरण ठरवण्यात आले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. पुढील दीड वर्षात राज्यात १० महापालिका, २७ जिल्हा परिषदा आणि ९७ नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
चार ठराव मंजूर
१. केंद्राचे शेतकरी व कामगार विरोधी कायदे त्वरित रद्द करावेत. केंद्राचे हे कायदे महाराष्ट्रात लागू करू नयेत.
२. वैधानिक मंडळे त्वरित स्थापन करून त्यानुसार निधीचे वितरण व्हावे.
३. मराठा व मुस्लिम आरक्षणाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा. इतर आरक्षणाला धक्का न लावता या दोन्ही समाजांना आरक्षण द्यावे.
४. आदिवासी, मागासवर्गीय समाज, ओबीसी, भटक्या जाती, अल्पसंख्याक समाजासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.