आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय्यत तयारी:मनपा निवडणुकांची लगीनघाई! ऑक्टोबरमध्ये मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुका शक्य

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकसदस्यीय प्रभाग रचनेमुळे भाजपच्या अडचणी वाढणार, निकालही बदलणार?
  • फेब्रुवारीत उर्वरित 9 महापालिकांच्या निवडणुका घेणार

औरंगाबाद, कोल्हापूर आणि वसई विरार या महापालिकांसह ६५ नगरपालिका आणि नगर परिषदांच्या कोरोना साथीमुळे प्रलंबित निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे. औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार आणि कोल्हापूर या महानगरपालिकांच्या निवडणुका वर्षभरापासून प्रलंबित आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी या निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

विधानसभांच्या निवडणुका होऊ शकतात तर महापालिकांच्या निवडणुका का घेण्यात येत नाहीत, असा सवाल या याचिकांमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती बघून ऑक्टोबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केल्याचे समजते.

प्रभाग रचनेचा इतिहास असा...
१९६८ मध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना होती. २ ते ६ नगरसेवक एका प्रभागात असत. २००२ मध्ये त्रिसदस्यीय रचना झाली. २००७ मध्ये एकसदस्यीय रचना केली. २०१२ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा ४ सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आली.

गेल्या वेळी भाजपने बाजी मारली
गेल्या वेळी झालेल्या महापालिका निवडणुकांत २८ पैकी ११ महापालिकांत भाजपने सत्ता मिळवली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीने ३, शिवसेनेने २, स्थानिक आघाड्यांनी २ तर दोन ठिकाणी भाजप-सेना युतीने विजय मिळवला होता.

फेब्रुवारी: प्रस्तावित निवडणुका
अंतिम मुदत : मुंबई -७ मार्च २०२२, अमरावती -६ मार्च २०२२, सोलापूर -७ मार्च २०२२. नाशिक -१४ मार्च २०२२. पिंपरी-चिंचवड - १३ मार्च २०२२, ठाणे - ५ मार्च २०२२. पुणे - १४ मार्च २०२२. अकोला - ८ मार्च २०२२. नागपूर - ४ मार्च २०२२. उल्हासनगर - ४ मार्च २०२२.

ऑक्टोबर : प्रस्तावित निवडणुका
अंतिम मुदत :औरंगाबाद -१८ एप्रिल २०२०, नवी मुंबई - ८ मे २०२०, वसई -विरार - २७ जून २०२०. कोल्हापूर - १५ नोव्हेंबर २०२०. येथे यंदा ऑक्टोबरमध्ये निवडणूक शक्य.

१० पालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत?

  • मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड यासह राज्यातील सुमारे १० महानगरपालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारीत अपेक्षित आहेत.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी लसीकरणाचा वेग वाढला आणि कोरोनाची लाट नियंत्रणात राहिली तर या सर्व निवडणुका वेळेवर होऊ शकतात.

एकसदस्यीय प्रभाग रचनेवर भर
२०१९ मध्ये आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कायद्यानुसार राज्य सरकारने एकसदस्यीय प्रभाग निश्चित केलेला आहे. हा प्रभाग दोन सदस्यांचा असावा, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले होते. मात्र, कायद्यात बदल करण्यासाठी विधिमंडळात निर्णय घ्यावा लागणार आहे. महाविकास आघाडी म्हणून राज्य सरकार या निवडणुकांना सामोरे जाणार असेल तर अंतर्गत वाद टाळण्यासाठी एकच प्रभाग सोयीचा आहे. या पार्श्वभूमीवर एकसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच या वेळी निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.

प्रभाग रचना १५ ऑगस्टपर्यंत
पालिका प्रशासनाकडून १ जुलैपासून प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. महापालिकांनी १५ ऑगस्टपर्यंत प्रभाग रचना अंतिम करणे आवश्यक असून त्यानंतर त्यावर हरकती- सूचना मागवण्यात येणार आहेत. या हरकती-सूचनांवर सुना‌वणी झाल्यानंतर १५ सप्टेंबरपूर्वी प्रभाग रचना निश्चित करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...