आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहनुमान चालीसा पठणावरून शिवसेना विरुद्ध अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा अशी राजकीय संघर्षांची ठिणगी उडाली आहे. 23 एप्रिलपासून राजद्रोहाच्या आरोपाखाली भायखळा तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर झाला असला तरी तरी त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी अवैध बांधकाम प्रकरणी राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी धडकले असून अनधिकृत बांधकामाची पालिकेकडून तपासणी केली जाणार आहे. राणा दाम्पत्याने घरात अवैध बांधकाम केले असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. पालिका अधिकारी घराचे आवश्यक मोजमाप घेतील. त्यानंतर त्यांना अवैध बांधकाम हटवण्यासाठी मुदत दिली जाईल. अवैध बांधकाम न हटवलं गेल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येईल.
मुंबई महापालिका कायदा 1888 मधील कलम 488 नुसार राणा दाम्पत्याला मंगळवारी नोटीस बजावण्यात आली होती. नवनीत राणा आणि रवी राणा यांचे खार येथे घर असून ज्या इमारतीत हे घर आहे. त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करण्यात आले आहे. पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम 488 नुसार अनेक सदनिकाधारकांना नोटिसा पाठवल्याची माहिती आहे. तर राजकीय आकसातून ही कारवाई करण्यात येत असल्याचे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हटले आहे.
शिवसेना विरुद्ध राणा -
नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घर असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केल्याने संपूर्ण वाद सुरू झाला. या घोषणेनंतर शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नवनीत राणांविरोधात निदर्शने केली. त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार पती रवी राणा यांनी 23 एप्रिल रोजी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली असली तरी पोलिसांनी त्यांना अटक करून तुरुंगात पाठवले. आज त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. दोघांनाही 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.