आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बप्पी लहरी यांचे निधन:डिस्को किंगने वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुलगा बाप्पा अमेरिकेतून परतल्यानंतर उद्या होतील अंत्य संस्कार

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रिटी केअर हॉस्पिटलने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लहरी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास निधन झाले. मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बप्पीदा गेल्या वर्षी कोविड पॉझिटिव्ह झाले होते. यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बप्पी लहरी यांना संगीत क्षेत्रातील डिस्को किंग म्हटले जात होते. त्यांचे खरे नाव आलोकेश लहरी होते. बप्पी लहरी हे संगीतासोबतच सोने घालण्याच्या शैलीसाठी ओळखले जात होते.

उद्या होतील अंत्य संस्कार
बप्पी लहरी यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांचा मुलगा बाप्पा सध्या अमेरिकेत असून उद्या दुपारपर्यंत तो मुंबईत पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.

क्रिटी केअर हॉस्पिटलने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले
बप्पी लहरी यांच्या निधनानंतर जुहूच्या क्रिटी केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे. बप्पी दा ओएसए-ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया आणि वारंवार छातीत होणा-या संक्रमणाने ग्रस्त होते. त्यांच्यावर डॉ. दीपक नामजोशी यांनी उपचार केले. 29 दिवस ते जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल होते. यानंतर 15 फेब्रुवारीला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, घरी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांना गंभीर अवस्थेत जुहूच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आणि मंगळवारी रात्री 11.45 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या एक वर्षापासून ते ओएसएने त्रस्त होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'बप्पी लहरी यांचे संगीत सर्वसमावेशक, विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. पिढ्यानपिढ्या लोक त्यांच्या संगीताचे चाहते राहिले आहेत. त्यांचा जिंदादिल स्वभाव सर्वांच्या लक्षात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रती संवेदना. ओम शांती', असे मोदी म्हणाले आहेत.

बप्पी यांची कारकीर्द

बप्पी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी कोलकाता येथे झाला. आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. बप्पी यांची इंडस्ट्रीत 48 वर्षांची कारकीर्द होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 5,000 गाणी संगीतबद्ध केली आहेत. यामध्ये त्यांनी हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, ओरिया, भोजपुरी, आसामी भाषा तसेच बांग्लादेशी चित्रपट आणि इंग्रजी गाणी कंपोज केली.

आवाज गमावला असल्याची उडाली होती अफवा

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बप्पी लहरी यांची तब्येत बिघडली असून त्यांनी त्यांचा आवाज गमावला असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर बप्पी दा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे वृत्त फेटाळून लावले होते. बप्पी दा यांनी लिहिले होते - माध्यमांमध्ये माझी तब्येत आणि आवाजाबाबत चुकीच्या बातम्या आल्या हे जाणून वाईट वाटले. माझ्या चाहत्यांच्या आणि माझ्या शुभचिंतकांच्या प्रार्थनांनी मी चांगला आहे.

बातम्या आणखी आहेत...