Maha Vikas Aghadi Morcha Today Live Updates; Shiv Sena NCP Congress BJP MVA | Mumbai News
'मविआ'चा हल्लाबोल:महाराष्ट्राचा लचका कसा तोडता ते पाहतो, ठाकरेंचा इशारा; कोश्यारींची हकालपट्टी करा, पवारांची मागणी
मुंबईएका महिन्यापूर्वी
कॉपी लिंक
महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व इतर भाजप नेत्यांविरोधात आज मुंबईत महाविकास आघाडी महामोर्चा काढला. नागपाडा येथील रिचर्डसन अँड कृडास येथून सुरू झालेल्या मोर्चाला लाखो नागरिक उपस्थितयत.
LIVE UPDATE
आजचा मोर्चा वेगळ्या स्थितीचे दर्शन करतोय. मला आठवतेय ७० वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर मुंबईत लाखोंचे मोर्चे निघाले. बेळगाव, कारवार, निपाणीचा महाराष्ट्रात सहभागी व्हावी, ही महाराष्ट्रवासीयांची मागणीय. या मोर्चाला लाखोंची शक्ती का आली, कारण महाराष्ट्राच्या सन्मासाठी. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ले होतायत. देशात अनेक राजे-रजवाडे होऊन गेले. मात्र, साडेतीनशे वर्षे झाली. सामान्य माणसाच्या हृदयावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपतींचे नाव कोरलेले आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करा, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. महामोर्चाला शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.
ज्यांनी-ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जगानं हे दृश्य पहिल्यांदाच पाहिले. संयुक्त महाराष्ट्रासाठी असाच संघर्ष करावा लागला. बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर्व पक्ष एकटवलेत. फक्त महाराष्ट्र द्रोही आणि बाळासाहेबांचे विचार सोबत घेऊन जाणारे तोतये या महामोर्चा नाहीत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी महामोर्चात भाषण केले.
बेताल वक्तव्ये करण्यामागचा मास्टरमाइंड कोण? राज्यपालांनी वक्तव्य केल्यानंतरही मंत्र्यांकडून वक्तव्ये सुरू. राज्यपालांनी माफी मागितली पाहिजे. भगतसिंह कोश्यारी यांना हटवले पाहिजे. वेळ पडली, तर कडक कायदा करावा. विधिमंडळ अधिवेशनात तशी मागणी करू. महाराष्ट्रातील गावे अचानक कर्नाटकात जाहीर केल्याचे का जाहीर करू लागले. याचे टुलकिट कुठून आले, असा सवालही अजित पवार यांनी केला. महामोर्चाला अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी, महाराष्ट्र द्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी, त्यांच्या मनात धडकी भरवण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा आयोजित केलाय. गेल्या सहा महिन्यांपासून हे सरकार आले. संकट जेव्हा महाराष्ट्रावर असते, तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उठतो. तो ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात महाराष्ट्र एकत्रित झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान केला आहे. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी तर अपमानाचा कळस गाठला. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा समोर आला, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
महाविकास आघाडीचा मोर्चा सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकेलेले पहिले पाऊल आहे. यापुढे गावा-गावात केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणीही यावेळी संजय राऊत यांनी केली.
विराट महामोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना डिसमिस केले आहे. या मोर्चाने इशारा दिला आहे की, शिंदे-फडणीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना पाहणार नाही. या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकेल का? शक्यच नाही. हे सरकार उलथवून टाकू, असा इशारा ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला.
महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा, हे सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी महामोर्चातील सभेत बोलताना दिला. महामोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते.
शरद पवारांचा आम्हाला कायम विरोधय. उद्धव ठाकरे यांनी सामावून घेतले नाही, तर एकटे लढू. सीमावादाचा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कॅरेक्टवर ठरतो. महाराष्ट्रातली गावे आंध्र, तेलंगणा, कर्नाटकात जाऊ द्या म्हणतायत. सीमावाद प्रकरणात राष्ट्रवादी-काँग्रेस पूर्णपणे दोषी. जेवढ्या लवकर त्यांच्यातून शिवसेना बाहेर येईल, तेवढा त्यांच्या ब्लेम येणार नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या मुंबईत निघालेल्या मोर्चाने वाहतूक कोंडी झालीय. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर ही वाहतूक कोंडी झालीय. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात. महामोर्चासाठी हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत. तर विकेंडसाठी अनेक मुंबईकर बाहेर जात आहेत. त्यामुळे मुंबई - पुणे एक्स्प्रेसवरवरील उर्से टोल नाका येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे समजते. मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी झालीय.
मराठी माणूस स्वाभिमानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला देवा समान आहेत. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. ही अस्मिता आणि स्वाभिमानाची लढाई आहे. ती सुरूच राहिल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे हे महामोर्चात सहभागी झालेत. महामोर्चात कार्यकर्त्यांनी शिवरायांचा पुतळा आणला.
तुमच्या डोळ्यांसमोर शिवरायांचा अपमान होतोय. तुम्ही काय करताय, तर स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवताय. हा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चाय. त्यात देवेंद्र फडणवीसांनी सहभागी व्हावे. ही आंदोलनाची पहिली ठिणगीय. यातून वणवा पेटेल, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. ते महामोर्चात सहभागी झालेत. महामोर्चात महापुरुषांचे पुतळे आणण्यात आले.
महामोर्चात कर्नाटकातील बेळगावमधून आलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडे कार्यकर्ते सहभागी झालेत. बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र करा, अशी जोरदार घोषणाबाजी या आंदोलकांनी केलीय. महामोर्चासाठी राज्यभरातून आलेले कार्यकर्ते.
सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीच्या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहचले आहेत. सुप्रिया सुळे, संजय राऊत हे महामोर्चात सहभागी झालेत. इतर नेतेही या मोर्चात सहभागी होतायत.
मुंबईत महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघाले आहेत. थोड्याच वेळात ते आंदोलनस्थळी दाखल होतील. महामोर्चात विविध संघटना सहभागी झाल्यात.
मोर्चाआधी मविआ नेत्यांची बैठक मुंबईत होत आहे. बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जंयत पाटील, दिलीप वळसे-पाटील, काँग्रेस नेते नाना पटोले दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात शिवसेनेचे नेतेही बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. बैठकीत भाजपला घेरण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
राज्यभरातील मविआचे कार्यकर्ते महामोर्चासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
मोर्चात सहभागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी भक्कम अशी वज्रमूठ केली आहे. महापुरुषांचा अवमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. तसेच, सीमाभागात मराठी भाषिकांची भयंकर अशी गळचेपी सुरू आहे. त्याला आवाज देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी भाजपच्या माफी मांगो आंदोलनावर टीका केली.
रोहित पवार म्हणाले, भाजपची भूमिका ही ढोंगी आहे. महापुरुषांच्या अवमानाबाबत भाजप खरेच संवेदनशील असेल तर त्यांनी सर्वांवरच कारवाई करण्याची मागणी करायला हवी. मात्र, आपले नेते बाजूला ठेवून इतरांवर टीका करणे हे ढोंग आहे.
राज्यभरातून मविआचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासह कार्यकर्ते, नागरिक मोर्चात सहभागी होत आहेत.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी ठाकरे गटाने फलक लावले आहेत. पोलिसांचा फौजफाटाही सकाळपासून रस्त्यावर तैनात आहे.
अशोक चव्हाणांची गैरहजेरी
महाविकास आघाडीसाठी अतिशय महत्त्वाच्या या महामोर्चात आघाडीतील सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहे. मात्र, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपण या मोर्चात सहभागी होणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज नांदेड येथे एका पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होता येणार नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.
महामोर्चाच्या समर्थनार्थ समाजवादी पक्षाने मुंबईत असे बॅनर लावले आहेत.
5.30 किलोमीटरचा मोर्चा
महाविकास आघाडातील सर्व प्रमुख नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात 1 लाख लोक सहभागी होतील, असा महाविकास आघाडीचा दावा आहे. भायखळा ते सीएसएमटी असे 5.30 किलोमीटर अंतर मोर्चेकरी चालणार आहेत. सरकारने 14 अटींसह मोर्चाला परवानगी दिली.
महामोर्चासाठी मुंबई पोलिसांच्या अटी
महामोर्चा शांततेत काढावा. कोणत्याही नेत्याने प्रक्षोभक भाषण करू नये.
मोर्चात काठी-लाठ्या तसेच यासारखे इतर हत्यारे घेऊन सहभागी होता येणार नाही.
मोर्चामुळे कुठेही कायदा-सुव्यवस्थेला बाधा होऊ नये, याची काळजी आयोजकांनी घ्यावी.
मोर्चादरम्यान पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन मोर्चेकरांनी करावे.
मोर्चादरम्यान फटाके वाजवण्यावर बंदी असेल.
पोलिसांनी मंजूर केलेल्या मार्गावरूनच मोर्चा काढावा. कोणत्याही परिस्थिती मोर्चाचा मार्ग बदलू नये.
मोर्चा एकाच ठिकाणी जास्त वेळ रेंगाळून ठेवू नये.
मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांची खातरजमा आयोजकांनी करावी.
मोर्चात अश्लील, आक्षेपार्ह हावभाव, वक्तव्य करू नये.
कोणत्याही क्षणी मोर्चा रद्द करण्याचा आदेश पोलिस देऊ शकते. त्याचे पालन करावे लागेल.
मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल
महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत आज सांयकाळपर्यंत बदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या बदलाविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार रिचर्डसन्स क्रूडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. या मार्गांऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी-चिंचपोकळी पूल- आर्थर रोड- सात रास्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- लॅमिंग्टनरोड- ऑपेरा हाउस-महर्षी कर्वे रोड (क्वीन्स रोड) या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, वाहन चालकांना सात रस्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- तारदेव सर्कल- नाना चौक- एन.एस. पुरंदरे रोड मार्गाचा वापर करता येईल, असे मुंबई पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.
मोर्चात 25 पक्ष -संघटना
समाजवादी पक्ष, सीपीआय, सीपीएम, लाल निशाण पक्ष, शेकाप, मराठा क्रांती ठोक मोर्चा, रिपाइंचा निकाळजे गट अशा 25 पक्ष-संघटनांनी महामोर्चाला पाठिंबा दिल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे.
मविआ महामोर्चा नेमका कशासाठी?
महापुरुषांचा अवमान, सीमाप्रश्नी होणारी गळचेपी याविरोधात मविआ नेते सरकारला जाब विचारणार.
कोश्यारी, चंद्रकांत पाटील त्यांचे टार्गेट असतील. पण भाजप नेत्यांनी दोघांचीही पाठराखण केली आहे.
सर्व महाराष्ट्रप्रेमींनी या माेर्चात सहभागी होण्याचे भावनिक आवाहन मविआ नेत्यांनी केले आहे.
मविआविरोधात भाजपचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.