आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वज्रमूठ सभा:बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही, तिथे 6 तारखेला जाऊन बोलणार, उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. तिथे मी 6 तारखेला जाऊन बोलणार आहे. मी तेव्हा बारसूसाठी पत्र दिले होते. मात्र, असा अत्याचार करून प्रकल्प उभारा म्हणून पत्र दिले नव्हते, असा घणाघाती हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारवर दिला. त्यांनी मुंबईत झालेल्या वज्रमूठ सभेत सरकारवर चौफेर टीका केली.

मंत्रिमंडळात मुंबई, पुणे, शेतकऱ्यांचा आवाज नाही. हे बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरचे सरकार आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. देशाच्या संविधानाचे रक्षण, हुकूमशाहीचा तीव्र विरोध आणि राज्यातील घटनाबाह्य खोके सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी ही वज्रमूठ सभा असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.

थेट सभास्थळावरून...

- पालघरमध्ये आदिवासींना घराबाहेर काढताय. परवा खारघरमध्ये श्रीसदस्यांनी तुमच्या हट्टापायी प्राण सोडले. बारसूच्या लोकांचे शाप तुम्हाला लागतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. माझे हिंदुत्व गोमूत्रधारी नाही, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. मोहन भागवत मशिदीत जातात तेव्हा ते काय सोडतील? शिवाय मी मशिदीत गेलो, तर किती बोंबाबोंब करतील? असा सवाल त्यांनी केला.

- अदानींची चौकशी करू नका. त्याऐवजी शाळेत त्यांचे धडे लावा. विद्यार्थ्यांना ते श्रीमंत कसे झाले, हे समजू द्या, अशी टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच चीन आपल्या देशाचा भूगोल बदलतो आहे, म्हणत केंद्रातल्या मोदी सरकारला लक्ष्य केले. खडसेंसारखे नेते भ्रष्टाचाराचे आरोप करून संपवले, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

- जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडेल, त्याचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई तोडता येत नाही, म्हणून मुंबई मारून टाकायची. तिची हत्या करायची हे यांचे मनसुबे आहेत. सगळे उद्योगधंदे बाहेर नेले जात आहेत. मुंबईतून सगळ्यात जास्त महसूल येतो. त्यामुळे तिच्या उत्पन्नाचे स्त्रोत मारून टाकले जात आहेत. शिवरायांनी सूरत लुटली होती. त्यापेक्षा भयंकर लूट सुरू आहे.

- बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. मी तिथे 6 तारखेला जाऊन बोलणार आहे. मी पत्र दिले होते. मात्र, तिथे लाठीमार करा असे पत्र दिले होते का? बारसूमध्ये अत्याचार करून प्रकल्प करा, असे पत्र दिले होते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईची सोन्यासारखी जमीन बुलेट ट्रेनच्या घशात घातली, असा आरोपही त्यांनी केला. बुलेट ट्रेनसाठी किती खोके घेतले होते, असा सवाल त्यांनी केला. तसेच कारशेडला विरोध नाही. मात्र, आरेच्या जागेला विरोध असल्याचे सांगितले.

- मोरारजी देसाई नावाच्या नरराक्षसाने गोळीबाराचे आदेश दिले. इमारतीवर अश्रूधुरांचा मारा केला. मात्र, मुंबईसाठी महिलांनी पुढे आल्या. गोळ्या आमच्यावर झाडा म्हणाल्या. मिंध्यांनी त्यांचे काही तरी घ्यावे. विषय बरेच आहेत. कर्नाटकची निवडणूक रंगात आलेली आहे. पंतप्रधान म्हणाले काँग्रेसने आपल्याला ९१ वेळा शिव्या दिल्या. मी शिव्या देण्याचे समर्थन करत नाही. तुम्हाला वाटते काँग्रेस तुम्हाला शिव्या देते. मात्र, तुमचे टीनपाटे आम्हाला भोके पडेस्तोर बोलतात, ते तुम्हाला दिसत नाही. तुम्ही त्या टीनपाटांना बुचं घाला. मग सगळे चांगले होईल. तुमची लोके बोलली, तर आमची लोके बोलणारच, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

- आपली राजधानी आंदण मिळालेली नाही. ती लढून मिळालेली आहे. मध्यरात्री हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करून आलो. यावेळी शिवसैनिकांनी सांगितलेले धक्कादायक होते. आम्ही पोहचलो तोपर्यंत हुतात्मा चौकात सरकारतर्फे कोणीही पोहचले नव्हते. आज सकाळी मात्र हे मिंधे तिकडे गेले असतील. ही मानवंदना देताना त्यांना एक सांगायचे आहे, यांनी जर का त्यावेळेला मुंबई लढा दिला नसता. तर आज गद्दारी करून का होईना, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

- मधल्या काळात दीडशे बैठका घेणारा नवा हिंद केसरी महाराष्ट्राला मिळाला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दीडशे बैठका घेतल्या. असे मी नाही, तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले. असे सरकार तुम्ही पाडायला लागला, तर देशात लोकशाही कशी राहणार. सत्ता येते आणि जाते. मात्र, जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

- पर्यटन विभागाने काल जाहिरात दिली. देखो आपला महाराष्ट्र. या सरकारला मराठी भाषेची अडचण निर्माण झाली आहे का? हे देखो कुठले काढले? पाहा आपला महाराष्ट्र म्हणा ना. आता यांनाच पाहायची वेळ आली आहे, असा इशारा यावेळी अजित पवार यांनी दिला.

- सरकारला मस्तवालपणा आलाय. सरकार महापालिका, नगरपालिकाच्या निवडणुका का जाहीर करत नाही. निवडणुकाची भीती सरकारला कशासाठी आहे? निवडणुका जाहीर झाल्या, तर जनता काय करेल याची भीती वाटते. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपंसुक म्हटले. असे कोणत्याही सरकारला म्हटले नाही. मात्र, याचे सरकारला काहीही वाटत नाही, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.

- मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान द्रौपदी मूर्मू म्हणतात. देशाचे पंतप्रधान मुर्मू आहेत? मुंबईत साडेतीशने कोटी रेल्वे लाइन टाकले म्हणाले. तुम्हाला जमेत नसेल, तर नोट वाचून दाखवा. मागेही एमपीएसीत असाच घोटाळा करून टाकला. कारण ते घोटाळा करूनच मुख्यमंत्री झाले आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली.

- मुंबई सहजासहजी मिळाली नाही. तिच्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. मुंबईचे मराठीपण टिकवण्यात आणि मुंबईचा मान-सन्मान वाढवण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. शिवसेनेमुळे मुंबई टिकली. हेच नेमके काहींच्या डोळ्यांवर आले. काही लोकांना फोडण्याचे राजकारण झाले. असे झाले तर बाबासाहेबांचे संविधान, कायदा राहणार आहे का, याचा विचार केला पाहिजे. हे सरकार आल्यापासून कोणत्याही निवडणुका बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीने यश मिळवले. जनता आपल्याबरोबर आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.

- सगळीकडे डबल इंजीनची चर्चा आहे. आता हे ट्रिपल इंजीन हवे म्हणतात. मात्र, आपले इंजीन ताकदीचे आहे. ज्यांचे इंजीन कमजोर आहे, त्यांना तीन - तीन इंजीन लागतात. यांचे ट्रिपल इंजीन नेमके कोणत्या दिशेने जाईल सांगता येत नाही. जीएसटी, नोटाबंदी, महागाई, बेरोजगारी. यांचे इंजीन कोणत्या दिशेने जाईल हे काही खरे नाही. यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्र, देशाच्या हिताचे आहेत का? यांना मुंबई महापालिकेचे 92 हजार कोटींचे फिक्स डिपॉझिट तोडायचे आहे म्हणून महापालिका हवी आहे. यांचे इंजीन चीनच्या घुसखोरीबद्दल काही बोलत नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर केली.

- आपण एकत्र आहोत, एकत्र राहणार आहोत. त्यासाठी आजची सभा आहे. महाराष्ट्रात परवाच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे निकाल पाहिले, तर तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचे भवितव्य घडवू शकतो. हाच कौल लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्याला दिला आहे. विधान परिषद निवडणुकीचे निकालही तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे चांगले लागले. आपण हॅटट्रिक केली आहे. आपल्याला आगामी काळात नगरपालिका, लोकसभा, विधानसभेचा सिक्सर मारायचा आहे. लोक आयाराम गयारामांना जवळ करणार नाहीत. महाराष्ट्रातले गलिच्छ राजकारण जनता खपवून घेणार नाही, अशी टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली.

- राज्यात शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. हे सरकार मूठभर लोकांसाठी नाही. जीएसटीद्वारे सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. तर अदानींना सूट मिळते. सरकारने अदानींसाठी काम करण्याऐवजी एकशे चाळीस कोटी लोकांसाठी काम केले पाहिजे. हे संविधान संपविण्यासाठी निघाले आहेत. हे हुकूमशाही सरकार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

- महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या. भाजप शेतकरी, मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या विरोधातले आहे. त्यामुळेच बाजार समितीमधला निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आला, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

- व्यासपीठावर तीन नेते आहेत. छगन भुजबळ, अनिल देशमुख आणि मी. आम्ही आत जाऊन बाहेर आलो आहोत. आता कोणाच्या बापाला घाबरत नाही. आंदोलन केले की जेलमध्ये टाकले जाते आहे. मात्र, आम्ही कोणालाही घाबरणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. देश लुटणारे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ झाले. सकाळचा गद्दार भाजपमध्ये गेल्यानंतर देशभक्त कसा होतो, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

- दादा सगळ्यांना तुमचे आकर्षण आहे. दादा येणार ना. दादा येणार ना. आम्ही म्हणतो दादा येणार, दादा बोलणार, दादा जिंकणार. आदित्य ठाकरेही जिंकले. काल आणखी एक इव्हेंट झाला. मन की बात. काय असते मन की बात? माधुरी दीक्षित गर्दी ऐकतेय. या देशाचा एकमेव पंतप्रधान पाहिला जो काम की बात करत नाही. फक्त मन की बात करतो. मात्र, ही वज्रमूठ सभा फक्त काम की बात करेल. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र रचले जाते आहे. त्यासाठी शिवसेनेवर हल्ला केला. जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना मजबूत आहे, तोपर्यंत मुंबई तोडता येत नाही, याची जाणीव त्यांना होती, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

- महाराष्ट्राला प्रणाम करण्यासाठी ही वज्रमूठ सभा. जेवढी सभा येथे भरली आहे, त्याच्या दुप्पट आणि तिप्पट लोक बाहेर आहेत. मुंबईतल्या सगळ्या लहान मैदानावर वज्रमूठ सभा होतेय, असे सकाळी भाजप नेते म्हणत होते. त्यांना सांगतो तुझे डोळे चिनी आहेत. बारीक आहेत. येथे येऊन पाहा. या सभेने निकाल दिलाय. मुंबई मराठी माणसांची. मुंबई आमच्या बापाची, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्यावर केला.

- पक्ष म्हणून आमचा स्वार्थ आहेच. मात्र, या राक्षसांना मुंबईतून, महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची गरज आहे, असे आवाहन भाई जगताप यांनी यावेळी केले. महाविकास आघाडी ही तुटकी-फुटकी नाही. एक गोष्ट मनापासून सांगतो की, आदित्य यांनी येथे भावनिक होऊन सांगितले. महाराष्ट्रात गद्दारी झाली, तेव्हा सर्वात पहिला फोन सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना केला. त्यांनी जे व्हायचे ते होऊ द्या. काँग्रेस तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन दिले. ज्यांच्यासोबत तुम्ही २५ वर्षे सोयरिक केली, त्यांनीच तुमच्या पाठित खंजीर खुपसला. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास तो नाही, असे भाई जगताप म्हणाले.

- वज्रमूठ सभांची सुरुवात संभाजीनगरमधून सुरू झाली. घटनाबाह्य सरकार हा सौम्य शब्द झाला. पन्नास खोके हे असंवैधानिक सरकार आहे. संभाजीनगरमध्ये पाच किलोमीटवर लोकांना थांबवायचा प्रयत्न झाला. मात्र, लोक थांबले नाहीत. कारण लोकांना गद्दार कोण हे समजले आहे, अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली.

- बिहार, बंगाल आणि महाराष्ट्रात दंगल झाली. या तीनच राज्यात दंगल का होत आहेत, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. आपण संविधान वाचवले नाही, तर लोकशाही विसरून जाऊ. या देशाच्या हितासाठी आपल्याला संविधान वाचवले पाहिजे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले.

- पन्नास खोके तुम्ही खाल्ले. महाराष्ट्राला काय मिळाले. पन्नास खोके म्हणताच तुम्ही का चिढता, पन्नास खोके तुम्ही स्वतःला का चिटकावून घेतले आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नव्हती. ती सुसंस्कृत होती. तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची अंत्ययात्रा काढली, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

- बारसू येथील लोकांशी अधिकाऱ्यांशिवाय कोणीही बोलले नाही. प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल, तर आम्ही स्थानिकांसोबत जाऊ. रिफायनरीला स्थानिकांचा विरोध असेल, तर आम्हीही विरोध करू, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

- कडकडीत उन्हात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. या ठिकाणी मृत्यू झालेल्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. तेव्हा स्पष्ट होते, इथे चेंगराचेंगरी झालेली आहे. आजपर्यंत एकाही मृताच्या घरी मंत्री गेलेले नाहीत. तुम्ही आप्पासाहेबांचा चेहरा वापरल्याचा आरोप, जितेंद्र आव्हाड यांनी केला.

- आज एक मे. महाराष्ट्राचा स्थापना दिन आणि कामगार दिवस. मुंबईची शोभा वाढवली कामगारांनी. आज मुंबईला केवळ कामागारांमुळे रूप आले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.

- मी लिहिलेला अग्रलेख उद्या पेपरमध्ये येईल. महाराष्ट्र नऊ-दहा महिन्यात अंधारात गेला. अडीच वर्षांत दंगली झाल्या नाहीत. ही संविधानाची लढाई आपण एकत्र आहोत. एक मुलगा म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मी आभार मानतो, आदित्य ठाकरे झाले भावुक.

- महाराष्ट्र आणि गुजरातचा स्थापना दिन एकच. मात्र, दोन्ही राज्याच्या कुंडलीत फरक आहे. दोन्ही राज्यांची जन्मतारीख एकच. मात्र, दोन्ही राज्यांचे नशीब. आपले मुख्यमंत्री गुजरातचे आहेत, असेच वाटते. गुजरातला जणू दोन मुख्यमंत्री आहेत, आदित्य ठाकरे यांची शिंदेंवर जोरदार टीका.

- सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे ताई यांना शिवीगाळ करणारे मंत्री आणि आमदार पदावर आहेत. आदित्य ठाकरे यांची शिंदे सरकारवर जोरदार टीका.

- कोविडच्या काळात उद्धव ठाकरे यांनी अर्थचक्र सांभाळाले. थोड्या दिवसाचा खेळ. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. या घटनाबाह्य सरकारमध्ये एकही महिला नाही, अस्सल मुंबईकर नाही. मंत्रिमंडळात मुंबई, पुण्याचा, शेतकऱ्यांचा आवाज नाही. हे बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरचे सरकार, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल.

- आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या रहात नाहीत. आम्ही सगळे संविधान रक्षक म्हणून एकत्र आलो आहोत. अजून लोक येत आहेत. त्यामुळे या खुर्च्याही भरतील. आदित्य ठाकरे यांचा प्रास्ताविकात आशावाद.

- विरोधी पक्षनेते अजित पवार हे बीकेसी मैदानावरच्या सभास्थळी दाखल झाले आहेत. सोबतच अशोक चव्हाण, भास्कर जाधव, सचिन अहीर, अस्लम शेख, अनिल परब ही नेते मंडळी सुद्धा सभास्थळी दाखल झाली आहे. - आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे बीकेसी मैदानावर दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड सभास्थळी उपस्थित. कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी.

- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई बीकेसी मैदानावर दाखल. सभास्थळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी.

- मुंबईतल्या बीकेसी मैदानावर होणाऱ्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांच्यासह कोण-कोण बोलणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

- संभाजीनगर, नागपूर येथे झालेल्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकार, भाजपवर सडकून टीका केली होती. त्यानंतर ही सभा ठाकरेंच्या होमग्राऊंडवर होत आहे.

- बारसू प्रकल्पावरून शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. थोड्याच वेळापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. आता उद्धव ठाकरे बारसू प्रकल्पावर काय बोलणार, कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.