आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप आमदार नमिता मुंदडा या आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला घेऊन आज अधिवेशनात आल्या होत्या. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या देखील आपल्या 5 महिन्यांच्या बाळाला घेऊन अधिवेशनात आल्या होत्या.
नुकत्याच आई झालेल्या महिला आमदार नमिता मुंदडा या आपल्या आपल्या दोन महिन्यांच्या लेकीसह अधिवेशनास उपस्थित आहेत. केजच्या आमदार नमिता मुंदडा दोन महिन्यांचे बाळ कडेवर घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या. महिला दिनाचे औचित्य साधून सभागृहात महिला लक्षवेधी सुचना मांडणार आहेत. यासाठी आज सर्वपक्षीय महिला आमदार हजर आहेत.
आज अधिवेशनात महिला लक्षवेधी सुचना मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर नमिता मुंदडा यांनी प्रत्येक अधिवेशनात महिलांना एक दोन दिवस लक्षवेधीसाठी राखीव ठेवले जावेत, अशी भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी हिरकणी कक्षाच्या सुविधेसाठी विधानसभा अध्यक्षांचे आभारही मानले आहेत.
अहिरेंना कोसळले होते रडू
शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. नमिता मुंदडा यांच्याआधी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे या हिरकणी कक्षाची अतिशय वाईट अवस्था पाहून भावुक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, माझ्या 5 महिन्यांच्या बाळाची तब्येत बरी नाही याठिकाणी धुळीत मी माझ्या बाळाला कसे ठेवावे? हा प्रश्न विचारताना त्यांना रडू कोसळले होते. त्यानंतर आता मुंदडा या देखील आपल्या मुलीसमवेत अधिवेशनाला हजर आहेत.
हिरकणी कक्षात सुधारणा
आमदार सरोज अहिरे आपल्या बाळाला घेऊन विधिमंडळात आल्या होत्या. त्यावेळी तिथल्या हिरकणी कक्षाची दुरावस्था झालेली होती. त्यानंतर तिथल्या हिरकणी कक्षामध्ये तात्काळ सुधारणा करण्यात आल्या आहेत.
कोण आहेत नमिता मुंदडा?
नमिता मुंदडा या बीडच्या आमदार आहेत. यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. 2019 च्या निवडणुकी वेळी शरद पवार यांनी नमिता मुंदडा यांची पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणाही केली होती. मात्र त्यानंतर नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सासूबाई विमल मुंदडा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना मंत्री होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.