आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत मंगळवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार अशी घोषणा केली, मात्र २०२४ च्या विधानसभा, लोकसभेचा स्वबळाचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील, असे पटोले यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले यांनी मंगळवारी प्रथमच राहुल गांधी यांची भेट घेतली. या वेळी सोबत राज्य प्रभारी एच. के. पाटील होते. राहुल यांच्याशी पटोले यांची तब्बल दीड तास चर्चा झाली. राहुल यांना पटोले यांचा आक्रमक बाणा पसंत आल्याचे कळते. बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा झाली नाही. विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचा असेल.
राज्यात पक्षात मोठे फेरबदल करण्यात येणार असून प्रदेश कार्यकारिणी व रिक्त जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यात येणार आहेत, असे पटोले यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. महाविकास आघाडीत काँग्रेसकडे ८ कॅबिनेट व २ राज्यमंत्रिपदे आहेत. त्यातील एक ते दोन मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी पटोले यांची मंत्री म्हणून वर्णी लागू शकते. वगळले जाणाऱ्या मंत्र्यांमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मत्सविकास मंत्री अस्लम शेख किंवा आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची मते एकमेकांकडे वळत नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे ठरले होते, त्यामुळे पटोले यांच्या घोषणेत नवे काय, असा आघाडीच्या नेत्यांमध्ये सूर आहे.
१. नाना हे २०२४ च्या विधानसभा व लोकसभेला स्वबळाची भाषा करत होते. मात्र हा निर्णय नंतर होईल, असे राहुल यांनी सांगितल्याने पटोलेंना चपराक बसल्याचे काँग्रेसमध्ये बोलले जात आहे.
२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी गेली १५ वर्षे स्वतंत्र लढत आलेत. त्याप्रमाणे २०२२ मध्ये तिन्ही पक्ष २७ जिल्हा परिषदा, १० महानगरपालिका आणि १९९ पंचायत समित्यांसाठी स्बळावर लढतील, असा राष्ट्रवादीत सूर आहे.
३. मुंबई, ठाणे परिसरातील ७ महापालिका क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीय मतदार निर्णायक आहे. काँग्रेस स्वतंत्र लढली तर भाजपच्या उत्तर भारतीय मतांमध्ये विभागणी होऊन शिवसेनेला लाभ होईल. म्हणून सेनेला स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढायला हव्या आहेत.
राहुल गांधींची नागपूर, औरंगाबादेत रॅली
राज्यात पक्षाला मोठी संधी असल्याचे आपण राहुल यांना सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्बळावर लढण्यास राहुल यांनी अनुमती दिली आहे. लवकरच राहुल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते नागपूर, मुंबई व औरंगाबादेत रॅली करतील, असे पटोले म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.