आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवरायांचा अपमान करणे भाजपचे नियोजित षडयंत्र:नाना पटोलेंचा गंभीर आरोप; म्हणाले - अपमान करणाऱ्यांवर कारवाई नाही?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. गेल्या काही दिवसात भाजपच्या काही नेत्यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेली वादग्रस्त वक्तव्ये यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपकडून कारवाई केली का जात नाही असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भारतीय जनता पक्षात चढाओढच लागल्याचे दिसत आहे. मागील महिनाभरात भाजपच्या चार-पाच नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. हे प्रकार अनवधानाने झालेले नसून भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपवर जोरदार टीकास्त्र

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरींचे गुनगाण गाण्याच्या नादात त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली होती. महाराज आता जुने आदर्श झाले, असून गडकरी नवे आदर्श आहेत असे वक्तव्य करून महाराजांचा घोर अपमान केला.

भाजपचे पदाधिकारी करताय अपमान

पटोले म्हणाले की, भाजपचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली असे निर्लज्ज वक्तव्य केले. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राजकीय बंडखोरीशी केली. तर आमदार प्रसाद लाड यांनी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचा जावई शोध लावला. एवढ्यावरच हे थांबले नाही तर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.

भाजपकडून केवळ सारवासारव

यापुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, याआधी छिंदम नावाच्या भाजपच्या नेत्यांनेही असेच दिवे लावले होते. यामध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे हे सर्वजण भारतीय जनता पक्षाचेच आहेत. महापुरुषांचा अपमान करणे, त्यांची बदनामी करणे यात भारतीय जनता पक्षाला काहीच वाटत नाही. राजरोसपणे अशी अपमान करणारी वक्तव्ये होत असताना या विधानांचा तीव्र शब्दात निषेध करून कारवाई करणे अपेक्षित होते पण भारतीय जनता पक्षाने तसे काहीही केले नाही उलट सारवासारव करण्यात आली.

सत्तेच्या गुर्मीमुळे वक्तव्य

भारतीय जनता पक्ष नितिमत्ता नसलेला पक्ष झाला आहे. महापुरुषांचा अवमान करण्याचे धाडस हे सत्तेची गुर्मी चढल्याने असून महाराष्ट्राची जनता आपल्या दैवतांचा अपमान कदापी सहन करणार नाही व भाजपाच्या या बेताल लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...