आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेस नेतृत्वावरुन जोरदार टीका केली. काँग्रेसची सध्याची अवस्था जमीनदारी संपली, उरलेला राजवाडा सांभाळता येईना अशी झाल्याची पवार म्हणाले होते. यावर काँग्रेस पक्षाकडून काय प्रत्युत्तर येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही टीका काँग्रेस पक्षाला चांगलीच खटकली असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ते म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष जमीनदाराचा पक्ष नसून त्याने लोकांना जमीन राखायला दिली. परंतु, राखणदारांनीच जमीन चोरली आणि दरोडा घातला. काँग्रेसने त्यांना ताकद दिली पण त्यांनीच काँग्रेसचा घात केला असा टोला नाना पटोलेंनी पवारांवर लगावला आहे.
आजही भाजपला काँग्रेसच पर्याय - पटोले
देशात लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. कोणी काय बोलाव हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण देशात आजही भाजप पक्षाला काँग्रेसच एकमेव पर्याय आहे आणि हे सर्वसामान्य जनतेला माहित आहे. देशात 2024 नंतर काँग्रेस पक्षाचा पंतप्रधान बनणार हे निश्चित आहे. कारण मोदी सरकार ज्याप्रकारे देश विकत आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष असून मोदी सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. शरद पवार मोठे नेते असल्याने मी त्यांच्याबद्दल बोलू नये असं ठरलेलं आहे. अशी टीका करुन काँग्रेसच नेतृत्व खच्ची करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
काय म्हणाले होते शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुलाखतीदरम्यान एक किस्सा सांगत काँग्रेसवर जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील जमिनदारांकडे मोठ्या प्रमाणात जमीनी आणि राजवाडे होते. परंतु, कमाल जमीन धारणा कायदा आल्याने त्यांच्याजवळील जमीनी गेल्या आणि राजवाडे किंवा हवेली तशाच राहिल्या.
जमिनदारांना आता आपली हवेली दुरस्त करण्याची ताकदसुद्धा राहिली नाहीत. त्यांच्याजवळ आता केवळ 10-15 एकर जमीनी आहेत. परंतु, त्यांना वाटते की, हे समोर शेतीत दिसणारे पीक आपलेच आहेत. अशी अवस्था काँग्रेसच पक्षाची झाली असल्याचे शरद पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.