आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित होते. नानांची तब्येत बरी नसल्याने ते येऊ शकले नाही, असे मविआच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात आले. मात्र आज खुद्द नाना पटोले यांनी, मी दिल्लीत असल्याने सभेला आलो नाही, अशी माहिती दिली. तसेच माझी तब्येत ठिक आहे, माझ्यामुळे इतरांची तब्येत खराब होईल, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची व्रजमूठ सभा काल पार पडली. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नाना पटोले हे नाराज आहेत त्यांना शिवसेनेची सावरकर भूमिका मान्य नाही अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. मात्र आता संजय राऊत यांच्यासह, महाविकास आघाडीतील नेत्यांनाच पटोले यांनी तोंडावर पाडले आहे. भाजपचे केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवेंनीही पटोलेंवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, कालची महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा उत्तमरितीने पार पडली. नाना पटोलेंची तब्येत बरी नसल्याने ते येऊ शकले नाही. मात्र काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे सगळे प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. नाना पटोलेंच्या गुजरात दौऱ्यावरील प्रश्नावर राऊत म्हणाले, आज नाना पटोलेंना गुजरात दौऱ्यावर जायचे होते यासाठीच त्यांनी काल आराम केला. त्यांच्या आवाजावरुन कळत होते की त्यांची तब्येत खराब होती. ते नाराज नाही.
नाना पटोले काय म्हणाले?
संजय राऊत यांनी नाना खरोखर आजारी होते ते नाराज नाहीत असे स्पष्टीकरण आज दिले. आणि यावरुन नाना पटोलेंनी राऊतांना चांगलेच तोंडघशी पाडल्याचे दिसते. नाना म्हणाले, काल मला दिल्लीत बोलावण्यात आले होते. आजच्या सुरतच्या दौऱ्याचे नियोजन होते त्याविषयीच्या बैठकीसाठी मी दिल्लीला आलो होतो. माझी तब्येत खराब आहे असे काल माध्यमात सांगण्यात आले. मात्र माझी तब्येत ठिक आहे.
दानवेंनी लगावला टोला
नाना पटोलेंच्या महाविकास आघाडीच्या सभेतील अनुपस्थितीवरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावर रावसाहेब दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दानवे म्हणाले, नाना पटोलेंच्या पोटाचे दुखणे नेमके काय आहे, हे सर्वांना ठाऊक आहे, अशाप्रकारचा टोला दानवेंनी लगावला.
ऐनवेळेवर पटोलेंचा न येण्याचा निर्णय
छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची विराट सभा पार पडली. या सभेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. सभेचे टिझर्स लॉन्च करण्यात आले होते. संभाजीनगरात चौकाचौकात पोस्टर्स, होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात आले होते. त्यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी मोठी तयारी केली होती.
या सभेची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु होती. मात्र, ऐनवेळी नाना पटोले सभेला येणाप नसल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी आपली प्रकृती बरी नसल्याचे कारण त्यांनी दिले. पटोले हे खरोखरच तब्येत ठिक नसल्याने सभेला गेले नसावेत असा सर्वांचाच सुरुवातीला समज होता. मात्र, पटोले यांच्या आत्ताच्या प्रतिक्रियेवरुन मविआचे नेते तोंडघशी पडले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.