आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2024 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात राहुल गांधींच्याच नेतृत्वात काँग्रेसची सत्ता येईल. यासोबतच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुद्धा नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, नाना पटोले यावेळी गैरहजर होते. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्याचे कारण सुद्धा नाना पटोले यांनी दिले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला तेव्हापासूनच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीत फुटीच्या चर्चा आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एचके पाटील यांनी मंगळवारी शरद पवारांची भेट घेतली.
या भेटीत नाना पटोले का नव्हते, तुम्हाला या गोष्टीचा राग आला का? असा प्रश्न आज त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, "मला राग वगैरे काही आलेला नाही. पवार साहेबांनी भेटीचे निमंत्रण मला दिलेच नव्हते. त्यांनी असे सांगितले नव्हते की येताना नानांना पण घेऊन या. आमच्या पक्षाचे नेते भेटून आल्यानंतर त्यांना मी विचारून माहिती घेतली. तेव्हा ओबीसी आरक्षण संदर्भात चर्चा झाली असे सांगण्यात आले. मी माझ्या पक्षाचे काम करतोय. मला राग वगैरे काहीच नाही. तरीही माझ्या पक्षाचे काम करत असताना कुणाला राग येत असेल तर मला अडचण नाही."
केंद्रात 2024 मध्ये काँग्रेसची सत्ता येईल
2024 मध्ये केंद्रात राहुल गांधी यांच्याच नेतृत्वात काँग्रेस सत्ता स्थापित करेल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. 2014 मध्ये काँग्रेसशी दगा झाला. आता 2024 मध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडीत कुठलेही फेरबदल नाही
महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून फुटीच्या आणि मतभेदाच्या चर्चा आहेत. हेच मतभेद दूर करण्यासाठी येत्या काही दिवसांत आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार अशी चर्चा सुरू आहे. परंतु, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. आगामी निवडणुकींच्या संदर्भात नुकतीच चर्चा झाली. हायकमांडकडून जे आदेश येतील ते पाळले जातील. परंतु, तूर्तास महाविकास आघाडीमध्ये फेरबदलांची चर्चा सुद्धा नाही असे नाना पटोलेंनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार आणि शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राउत यांनी अग्रलेखात नाना पटोलेंवर टीका केली असे म्हटले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात राउत यांनी आपल्या विरोधात काहीही बोलले नाही. उलट नानांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेसला उभारी आली आहे. अशीच उभारी देशात सुद्धा यावी अशा शुभेच्छाच त्यांनी दिल्या आहेत. असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.