आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनसाइड स्टोरी:वर्षा बंगल्यावर रात्री 11 वाजता लिहिली गेली अटकेची स्क्रिप्ट; मुंबईत राडा नको म्हणून बाहेर नोंदवण्यात आला राणेंविरुद्ध गुन्हा

मुंबई2 महिन्यांपूर्वीलेखक: अशोक अडसूळ
  • कॉपी लिंक

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांच्या अटकेची संहिता सोमवारी रात्री ११ वाजता “वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी लिहिली गेली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यावर त्या संहितेवर शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती एका मंत्र्याने “दिव्य मराठी’ला दिली.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाचे १९ ऑगस्ट रोजी दर्शन घेऊन राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला. राणे यांनी पार्कवर केलेल्या उद्धव यांच्यावरील वक्तव्यामुळे त्याच दिवशी राडा होण्याची शक्यता होती. मात्र सेना नेतृत्वाने संयम राखला. जनआशीर्वाद यात्रा अडवण्याची महाविकास आघाडी संधी शोधत होती. राज्य सरकारचे यात्रेवर लक्ष होते. ती संधी रविवारच्या राणे यांच्या पत्रकार परिषदेने मिळाली. सोमवारी दुपारी यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाली. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यात आला.

राणे यांना अटक करायची असेल तरच गुन्हा नोंदवा, अशी सूचना शरद पवार यांनी केली. त्याला शिवसेना नेतृत्वाने म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला. गृह मंत्रालय राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे. त्यानंतर राणे यांच्यावरील कारवाईची सूत्रे राष्ट्रवादीने हाती घेतली. मुंबईत कोणताही राडा नको, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर गुन्हा मुंबईबाहेर नोंदवण्याचा निर्णय झाला. त्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली. राणे यांना अटक होणार हे निश्चित झाले होते. मात्र त्यासाठी वातावरण तापवणे गरजेचे होते. ते काम सेनेने हाती घेतले.

मुंबईहून सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन करण्याचे निरोप गेले. मुंबईत पहाटे पहाटे राणे यांच्या विरोधातली पोस्टर्स लागली. संहितेप्रमाणे सर्व घडून आले. राणे यांच्या अटकेची कारवाई मंगळवारी प्रत्यक्षात आली.

बातम्या आणखी आहेत...