आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:अबोल सरकार सत्तेत राहणे हिताचे नाही, चारच महिन्यांत राज्य 10 वर्षे मागे गेले, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री कुठे सापडणार नाही

गेल्या चार महिन्यांत राज्य १० वर्षे मागे गेले आहे. राज्याला आज मुख्यमंत्रीच नाही. ज्या नेत्याकडे हे पद आहे तो ‘मातोश्री’च्या पिंजऱ्यात बसला आहे.  तो ‘मातोश्री’पुरताच मुख्यमंत्री आहे. एकतर ते तिथून बाहेर येत नाहीत, आणि आलेच तर काही बोलत नाहीत. त्यामुळे हे अबोल, निष्क्रीय सरकार सत्तेत राहणे राज्याच्या हिताचे नाही’, अशा शब्दांत भाजप नेते, खा.नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.  

  राणे यांनी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले की, कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. मुंबईत ५ हजारावर तर राज्यात ८ हजारावर बळी गेले आहेत. ही स्थिती असतानाही सरकार जराही गंभीर नाही. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्रीच राज्याच्या मंत्रालयात बसत नाही. सगळा कारभार मातोश्री या निवासस्थानातून चालवला जातो. हे असंच चालणार असेल तर ज्या सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय असं केलं होतं ते नाव आता पुन्हा एकदा सचिवालय करावं लागेल. मुख्यमंत्री डोळे मिटून लॉकडाऊन करत सुटले आहेत. मागचापुढचा कोणताही विचार केला जात नाही. लॉकडाऊन करायला हवे पण कुठपर्यंत तेही ठरवायला हवे लॉक डाऊन वाढत असताना प्रत्येक महिन्यात नवे प्रश्न उभे राहत आहेत. करोनाचे रुग्णही कमी होत नाहीत. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगधंदे बंद पडले आहेत. मुंबईसारख्या शहरात रियल इस्टेटचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकऱ्याला बोगस बियाणं देऊन फसवलं जात आहे. कोकणात चक्रीवादळ आलं तिथे मदतीचा एक रुपयाही अद्याप मिळालेला नाही. अनेक ठिकाणी अजून पंचनामेही केले गेलेले नाहीत. पगाराचे प्रश्नही आवासून उभे आहेत. होमगार्डचे पगार झालेले नाही. असे एक ना अनेक प्रश्न असून राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर हे सरकार जायला हवे, असे राणे म्हणाले. 

राज्य अधिकारी चालवत आहेत. मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर कोणताही अंकुश दिसत नाही. बदल्या परस्पर केल्या जातात. त्या परत रद्द केल्या जातात. अशाप्रकारे राज्य चालू शकत नाही, असेही ते म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser