आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा:मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारचा निर्णय, कोविड सेवा केलेल्यांना नोकरभरतीत प्राधान्य

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात 17 सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा राबवण्यात येईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन 2 ऑक्टोबरपर्यंत हा पंधरवडा असेल. अशा पद्धतीने राज्यात 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा' राबवला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. कोविड काळात सेवा दिलेल्या आरोग्य सेवक, सेविकांना यापुढे शासकीय नोकरभरतीत प्राधान्य दिले जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णयही राज्य सरकारने घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

15 दिवस मिशन मोडवर सेवा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यात 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा राबवण्यात येईल. या काळात नागरिकांना सर्व प्रकारच्या शासकीय सेवा जसे की, दाखले, नकाशे, विविध प्रमाणपत्रे अधिकाधिक वेगाने देण्यात येईल. याशिवाय नागरिकांच्या विविध किरकोळ समस्या व मागण्या 15 दिवसांत मिशन मोडवर निकाली काढण्यात येतील.

'त्यांना' भरतीत प्राधान्य

फडणवीस यांनी सांगितले. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यामध्ये वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे. सार्वजनिक आरोग्यमधील भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेतली जाईल. नोकरभरतीत त्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश दिले आहेत.

मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय

  • अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार. या भागांत नागरी सुविधा पुरविण्यासाठी विशेष धोरण तयार करणार
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढणार
  • नाशिक जिल्हयातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारीत प्रशासकीय मान्यता.
  • नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करण्यास मान्यता.
  • महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या मुंबई, पुणे व नागपूर खंडपीठास मुदतवाढ.
  • केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणीकरण करण्यासाठी योजना राबविणार.
  • 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 'राष्ट्रनेता से राष्ट्रपिता' हा सेवा पंधरवडा राबविणार. नागरिकांचे अर्ज व तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी हा उपक्रम.
  • कोविड काळातील कंत्राटी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुणांकन करणार. अशा कर्मचाऱ्यांना आरोग्य भरतीत प्राधान्य
  • कोविड लसीची बूस्टर मात्रा देण्याची मोहीम अधिक वेगाने राबविण्याचे निर्देश. रुग्ण संख्या कमी होत असली तरी गाफील न राहता लसीकरण वाढवण्याचे निर्देश
बातम्या आणखी आहेत...