आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनीत राणांनी घेतली फडणवीस, राज्यपालांची भेट:विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची 50 टक्के मते भाजपला, राणांचा दावा

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी फडणवीस यांची तर, राज्यातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. तसेच, विधान परिषद निवडणुकीत भाजप विजय मिळवेल. निवडणुकीत शिवसेनेची 50 टक्के मते भाजपला मिळतील, असा दावा भेटीनंतर नवनीत राणा यांनी केला.

विधान परिषदेत भाजप मजबूत होणार

राणा म्हणाल्या, राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे कुशल नेतृत्व आणि योग्य नियोजनामुळे भाजपला यश मिळाले. विधान परिषद निडवणुकीत भाजप राज्यसभेपेक्षा मोठा विजय मिळवेल. विधान परिषदेत आमदारांचे मतदान हे गुप्त असते. शिवसेनेचे आमदारच मविआला कंटाळले आहेत. या निवडणुकीत भाजपला जास्त मते मिळावीत, ही शिवसेना आमदारांचीच इच्छा आहे. त्यामुळे शिवसेनेची 50 टक्क्यांहून अधिक मते भाजपला मिळतील. या निवडणुकीनंतर राज्याच्या विधान परिषदेत भाजपची स्थिती आणखी मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई पालिका भाजपकडे येईल

मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेनाविरोधात आम्ही पुर्ण ताकदीनिशी उतरणार आहोत. शिवसेनेमुळे मुंबई आता भ्रष्टाचाराची लंका झाली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत जनताच शिवसेनेला उत्तर देईल. मुंबई पालिकेवरही भाजपचा झेंडा फडकेल, असे नवनीत राणा म्हणाल्या.

ठाकरेंनी बांधावर जावे

राणा म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही घराबाहेर पडत नाही. त्यामुळे राज्यातील समस्यांबाबत त्यांना काहीही माहिती नसते. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे राज्यात नवीन उद्योगधंदे येत नाही. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढल्याची टीका नवनीत राणा यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, तेव्हाच त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या कळतील.

जबाबदारीने उत्तर द्यावे

राहुल गांधी यांच्या ईडीचौकशी विरोधात आज राजभवनासमोर काँग्रेस नेते आंदोलन करणार आहेत. त्यावर टीका करत एखाद्या विभागाने लोकप्रतिनिधींकडे काही माहिती मागितली असेल तर ती माहिती देणे, ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. चौकशीचा सन्मान लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. संविधानासमोर सर्व समान आहेत. कोणाला विशेष वागणूक दिली जात नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...