आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर राणा दाम्पत्याची सुटका:12 दिवसांनंतर पती-पत्नी तुरुंगाबाहेर, रवी राणा भेटताच नवनीत यांच्या अश्रूंचा बांध अनावर

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुरुंगातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी हात जोडत माध्यमांना अभिवादन केले. - Divya Marathi
तुरुंगातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी हात जोडत माध्यमांना अभिवादन केले.

12 दिवसांपासून राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असणाऱ्या राणा दाम्पत्याची आज सुटका झाली. नवनीत राणा यांची रवी राणा यांच्या काही तास आधी सुटका झाली होती पण त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रवी राणा कारागृहातून बाहेर येताच लीलावतीत पोहचले. दोघांची 12 दिवसानंतरची ही पहिली भेट ठरली. पतीला पाहून नवनीत राणा भाऊक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

तत्पूर्वी खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर आताच आमदार रवी राणा यांचीही तळोजा कारागृहातून आता सुटका झाली. ते कारागृहातून हनुमान चालिसा म्हणत बाहेर पडले.

गाडीतून ते आता लिलावती रुग्णालयात गेले असून छातीत त्रास जाणवल्याने लिलावती रुग्णालयात भरती असलेल्या त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांची ते भेट घेतली. त्यानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले आहेत. नवनीत राणा यांची आजच भायखळा कारागृहातून सुटका झाली आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना 23 एप्रिलला अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी त्यांना जामीन मंजूर केला होता. पण, कागदोपत्री कारवाई पूर्ण न झाल्यामुळे बुधवारची रात्र त्यांना तुरुंगातच काढावी लागली होती. अखेर गुरुवारी सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर नवनीत राणांची सुटका करण्यात आली तर रवी राणांच्या सुटकेबाबतची प्रक्रियाही सुरू आहे.

भायखळा कारागृहातून बाहेर पडताना नवनीत राणा.
भायखळा कारागृहातून बाहेर पडताना नवनीत राणा.

तुरुंगातून नवनीत राणा थेट तुरुंगात, किरीट सोमय्यांची सरकारवर टीका
दरम्यान, तुरुंगातून बाहेर पडताच नवनीत राणांना तुरुंगात पोटदुखी व मानदुखीच्या त्रासामुळे थेट लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यापुर्वी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. हनुमान चालिसाचा आग्रह करणाऱ्यांकडून सरकारचा छळ केला जात आहे. केवळ 12 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर नवनीत राणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सरकारची ही दडपशाही सुरू आहे. अशास माफिया सरकारपासून महाराष्ट्राची सुटका व्हायला हवी, असेही सोमय्या म्हणाले.

नवनीत राणा यांचे 50 हजारांचे जामीनपत्र
नवनीत राणा यांचे 50 हजारांचे जामीनपत्र

राणा दाम्पत्याकडून गुरुवारी प्रत्येकी 50 हजार रुपयांचे जामीनपत्र बोरिवली न्यायालयात जमा करण्यात आले. दंडाधिकाऱ्यांच्या सुटकेचे आदेश घेऊन दोन पथके भायखळा आणि तळोजा कारागृहात पोहोचली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याची सुटका करण्यात आली.

तुरुंग प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर तब्येत बिघडली नसती, राणांच्या वकिलांचा दाव
तुरुंग प्रशासनाने वेळीच नवनीत राणांच्या यांच्या ढासळत्या तब्येतीची दखल घेतली असती तर नवनीत राणांची तब्येत एवढी बिघडली नसती, असे नवनीत राणा यांच्या वकिलांनी म्हटले आहे. तसेच, तुरुंग प्रशासनाच्या डॉक्टरांकडूनही नवनीत राणा यांची तपासणी करण्यात आली होती. या डॉक्टरांनी नवनीत राणांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सुचनाही केल्या होत्या. मात्र, तुरुंग प्रशासनाकडून याप्रकरणी हलगर्जी करण्यात आली. त्यामुळेच राणांची तब्येत बिघडली, असा आरोपही राणांच्या वकिलांनी केला.

12 दिवसांनंतर मिळाला जामीन

दरम्यान, कोर्टाच्या आदेशाची पुर्ण प्रत न मिळाल्याने कोठडीतून सुटल्यानंतर राणा दाम्पत्याला मुंबई सोडता येणार की नाही, हे आताच सांगू शकत नाही, असे या दाम्पत्याचे वकिल रिझवान मर्चंट यांनी सांगितले आहे.

उच्च न्यायालायन्या जामिनामुळे राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला असला तरी काल नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना काही तासांसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. नवनीत राणा अनेक दिवसांपासून पाठदुखीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे वेदना कमी करण्यासाठी काल डॉक्टरांनी त्यांना औषधेही दिली. त्यानंतर त्यांना पुन्हा भायखळा तुरुंगात आणण्यात आले होते.

बुधवारीदेखील तब्येत प्रचंड बिघडल्याने नवनीत राणांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते.
बुधवारीदेखील तब्येत प्रचंड बिघडल्याने नवनीत राणांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते.

मुंबई पालिकेचे पथक आजही घरी धडकले

मुंबई महानगरपालिकेचे पथक कालच खार येथील राणा दाम्पत्याच्या घरी धडकले होते. या घरात अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार महापालिकेकडे आली आहे. त्याआधारावर पालिकेने राणांच्या घराबाहेर एक नोटीसही लावली आहे. त्यानुसार बुधवारी फ्लॅटची पाहणी करून बेकायदा बांधकामाची चौकशी करणार असल्याचे मुंबई पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र, राणा दाम्पत्य तुरुंगात असल्याने काल घर बंदच होते. त्यामुळे मुंबई पालिकेचे पथक घराची पाहणी करू शकले नाही. त्यामुळे आजदेखील मुंबई पालिकेचे पथक राणा दाम्पत्याच्या घरी धडकले होते. फ्लॅटमध्ये बेकायदेशीर बांधकाम आढळून आल्यास ते हटवण्याचे काम बीएमसीच्या तोडणी पथकाकडून केले जाणार आहे.

खार येथील राणा दाम्पत्याच्या घरी धडकलेले मुंबई पालिकेचे पथक.
खार येथील राणा दाम्पत्याच्या घरी धडकलेले मुंबई पालिकेचे पथक.

न्यायालयाने या 4 अटींवर राणा दाम्पत्याला दिला आहे जामीन

  • राणा दाम्पत्याने चौकशीत सहभागी होत राहावे
  • अशा प्रकारचे आणखी कोणतेही वादविवाद करू नये
  • पुराव्यांशी छेडछाड करू नये
  • या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही

न्यायालयाच्या पूर्ण आदेशाची प्रतीक्षा
जामीनानंतर राणा दाम्पत्य पुन्हा आपल्या अमरावतीच्या घरी जाण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याच्या मुंबईबाहेर जाण्याच्या अटींबाबत त्यांचे वकिल रिझवान मर्चंट यांनी सांगितले की, आमच्याकडे आतापर्यंत कोर्टाचे केवळ डायरेक्टिव्ह आदेश आले आहेत. राणा दाम्पत्य अमरावतीला जाऊ शकेल की नाही, हे पूर्ण ऑर्डर आल्यावरच सांगता येईल. त्यामुळे कोर्टाच्या पुर्ण ऑर्डरची आम्हालाही प्रतीक्षा असल्याचे मर्चंट म्हणाले.

गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाचा नकार
राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 15A, 353 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय राणा दाम्पत्यावर 124A म्हणजेच देशद्रोहाचा गुन्हाही दाखल आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचे आवाहन केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...