आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणा दाम्पत्याविरोधात वॉरंट जारी:हनुमान चालिसा प्रकरणी न्यायालयाचे निर्देश, सुनावणीस गैरहजर राहिल्याने कारवाई

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात वॉरंट बजावण्यात आले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर घडलेल्या हनुमान चालिसा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे.

11 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे होते आदेश

हनुमान चालिसा प्रकरणी सुनावणीसाठी हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे. वांद्रे स्थित मातोश्री येथे घडलेल्या हनुमान चालिसा प्रकरणानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी राणा दाम्पत्याला 11 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. हे निर्देश असतानाही राणा दाम्पत्य न्यायालयासमोर हजर झाले नाही. त्यामुळे दाम्पत्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय?

मनसेने मशिदीवरील भोंग्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात हनुमान चालिसावरुनही वाद पेटला होता. त्याचवेळी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले होते. सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा म्हणावी, अशी मागणी करणाऱ्या राणा दाम्पत्याने नंतर उद्धव ठाकरेंचे घर 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरला. यासाठी राणा दाम्पत्यांनी गनिमा काव्याने मुंबईत इंट्री केली होती. याला शिवसैनिकांनी जोरदार विरोद केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

राणा सध्या जामिनावर

सामाजिक अशांतता तसेच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, असे सांगत मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. अटक केल्यानंतर राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर केले असता त्यांच्यावर राजद्रोहाची कलमे लावण्यात आली असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे. ही कोठडी संपल्यानंतर राणा दाम्पत्याला काही अटींसह जामीन मंजूर करण्यात आला होता. राणा दाम्पत्य सध्या जामिनावरच आहेत.

बातम्या आणखी आहेत...