आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजे हनुमानाचे नाही झाले, ते प्रभू श्री रामाचे काय होणार?, अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर केली आहे. राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यासाठी राणा दाम्पत्य मुंंबईत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेला पुन्हा लक्ष्य केले.
महाराष्ट्रात हिंदुत्वाचा अपमान
महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणण्यासाठी उद्धव ठाकरे नकार देतात. हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर राजद्रोहाचे खटले दाखल केले जातात. महाराष्ट्रात अशा प्रकारे हिंदुत्वाचा अपमान करून शिवसेना आज अयोध्येत रामाच्या दर्शनाचे ढोंग करत आहे, अशी टीका नवनीत राणा यांनी केली. तसेच, उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह केल्यानंतर आम्हाला जम्मू-काश्मिरातील लाल चौकात हनुमान चालिसा म्हणण्याचे सांगण्यात आले. मात्र, हेच नेते आज अयोध्येत रामभक्तीचे ढोंग करत आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या.
विधान परिषदेत ताकद दिसणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात जे काही पापा केले आहेत, ते धुवून काढण्यासाठीच शिवसेना अयोध्येत रामाचे दर्शन घेत आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली. हनुमान भक्तींची ताकद राज्यसभा निवडणुकीत दिसून आली आहे. यापुढे विधान परिषद व मुंबई पालिकेतही आम्हा भक्तांची ताकद शिवसेनेला दिसेल. विधान परिषदेत मविआची 50 गुप्त मते भाजपला पडतील. या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव होईल, असे राणा म्हणाले.
ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायलाच लावणार
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यास नकार दिला आहे. मात्र, आम्ही त्यांना राज्यात हनुमान चालिसा म्हणायलाच लावू, असे यावेळी नवनीत राणा म्हणाल्या. तसेच, आज राजद्रोहाच्या खटल्याप्रकरणी आमचा जामिन रद्द करावा, अशी मागणी सरकारकडून करण्यात येणार आहे. मात्र, आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा जामीन रद्द होणार नाही व राजद्रोहाचा खटलाच रद्द व्हावा, यासाठी आम्ही उच्च न्यायालयातही धाव घेणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.
अनिल परबांना अटक होणार
दापोली रिसॉर्ट गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आज चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले आहे. आज अनिल परबांची चौकशी करून त्यांना ईडी अटक करेल, असे रवी राणा म्हणाले. मविआचे नेते ढोंगी, भ्रष्टाचारी आहेत हे राज्यातील जनतेलाही कळून चुकले आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच, मुंबईत अटक केल्याप्रकरणी नवनीत राणा यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात संसदीय समितीकडे तक्रार केली आहे. या समितीपुढे आज संजय पांडे हजर होणार आहेत. संजय पांडे यांनी आपल्याला बेकायदा अटक केली होती. त्यामुळे त्यांच्यावर संसदीय समिती नक्की कारवाई करेल, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.