आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जी स्फोटके ठेवण्यात आली होती. त्या प्रकरणाचे मास्टरमार्ईंड परमबीर सिंह हेच आहे. मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सचिन वाझे हा परमबीर सिंह यांच्याच टोळीचा भाग आहे.
परमबीर सिंह ठाण्यात पोलिस आयुक्त असतानाही त्यांचे भाजपच्या नेत्यांना हाताशी धरुन अनेक उद्योग सुरू होते. अँटिलिया प्रकरणानंतर बदली झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी खोटे आरोप करुन अनिल देशमुख आणि महाविकासआघाडी सरकारला बदनाम केले, असे नवाब मलिक यांनी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत मलिक यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह केंद्रीय यंत्रणाच्या कार्यपद्धतीवर देखील टीका केली. भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांविरुद्धही ईडी कारवाई केली जात आहे. देशभरात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचे मलिक म्हणाले.
महाराष्ट्रात कितीही दबाव निर्माण केला तरी सरकार झुकत नाही हे पाहून भाजपकडून वेगवेगळे डावपेच खेळले जात आहेत. परंतु, केंद्रातील भाजप सरकारने सत्तेचा कितीही दुरुपयोग केला तरी महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांमधील कोणताही नेता दबावाला बळी पडणार नाही. असा इशारा मलिक यांनी भाजपला दिला.
पत्रकार परिषदेत मलिक यांनी सचिन वाझेवर देखील हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सचिन वाझेला पुन्हा पोलिस दलात घेण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात झालेली नाही. सचिन वाझे पोलिस दलातून निलंबित झाला असला तरी तो परमबीर सिंह यांच्यासाठी काम करत होता. ज्याठिकाणी परमबीर सिंह यांची पोस्टिंग व्हायची, त्याठिकाणी सचिन वाझे असायचा. परमबीर सिंह यांच्यासारख्या पोलिस अधिकाऱ्यांची एक टोळीच होती. असे मलिक म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.