आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. कोठडीतील चौकशीच्या तिसऱ्याच दिवशी सकाळी त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आर्थिक गैव्यवहारप्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असली तरी उत्पन्न आणि मालमत्ता जमवण्याच्या बाबतीत ते पत्नी मेहजबीन यांच्यापेक्षा गरीब असल्याचे समोर आले आहे. नवाब यांच्या पत्नीकडे सातपट जास्त जमीनजुमला, पाचपट अधिक पैसाअडका असल्याचे मलिक यांच्या दोन वेळेच्या निवडणूक शपथपत्रांतून दिसते. नवाबांच्या तुलनेत मेहजबीन यांच्याकडे नगदी पैसा, फिक्स डिपॉझिट, दागिने, शेती आणि फ्लॅट कित्येक पटीने जास्त आहेत. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन हाेण्याच्या आधी ५ वर्षे सत्ता नसतानाही मलिक दांपत्याच्या उत्पन्नाचा झरा आटलेला नाही. त्यात वाढच होत आहे.
नवाब मलिक मुंबईतील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळेस निवडून आले आहेत. त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंधित ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. कोट्यवधींच्या आर्थिक उलाढाली करणाऱ्या मलिक व कुटुंबीयांची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या २०१४ आणि २०१९ मधील निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्राचा अभ्यास केला. त्यातून ही माहिती समोर आली.
कमाईपेक्षा मोठा व्यवहार
३७ लाखांची कमाई असताना मलिक यांनी ५५ लाखांची जमीन घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. मलिक यांनी निवडणूक घोषणापत्रात उत्पन्नाचे साधन शेती आणि व्यवसाय दाखवले आहे. नेमका कोणता व्यवसाय आहे, हे नमूद नाही. २०१४ ते २०१९ मध्ये विराेधी पक्षात असतानाही एक वर्षाचा अपवाद वगळता त्यांच्या कमाईत सातत्याने वाढ होत गेली. २०१४-१५ ते २०१८-१९ या पाच वर्षात त्यांनी ३७ लाख ८९,२७६ रुपये कमावले. याच पाच वर्षात त्यांच्या पत्नी मेहजबीन मलिक यांनी ५३ लाख ९४,१३० रुपयांची कमाई केली.
पत्नीच्या श्रीमंतीत वाढ
निवडणूक शपथपत्रात उमेदवार आणि त्यांच्या पत्नीच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचे विवरण देणे बंधनकारक असते. या दोन्ही उत्पन्न स्रोतांत २०१४ आणि २०१९ मध्ये नवाब मलिक यांच्यापेक्षा मेहजबीन मलिक सरस ठरल्या आहेत. पाच वर्षांत मलिक यांची जंगम मालमत्ता ४ लाखांनी घटली आहे. मेहजबीन यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत वरचेवर वाढच झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.