आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे. जमीन खरेदी प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या कारणावरून बुधवारी सकाळी आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.
विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करून ईडीने 14 दिवसांची कोठडी मागितली होती. सुमारे 5 तास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांना त्यांची औषधे तुरुंगात ठेवण्यास आणि घरी बनवलेले अन्न खाण्यासही न्यायालयाने परवानगी दिली आहे.
या खटल्याची सुनावणी सुरू असताना न्यायालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. कोर्टातून बाहेर पडताना, कारमधून निघताना, मलिकांनी हात हलवून सर्वकाही ठीक असल्याचे संकेत दिले आणि तेथून ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत निघून गेले. मलिक यांचे समर्थक भडकवण्याची भीती लक्षात घेऊन ईडी कार्यालयात सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे.
दुसरीकडे, मलिकांच्या अटकेनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' या शासकीय बंगल्यावर पोहोचले आहेत. ठाकरे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांचीही बैठक घेतली. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शरद पवारांना फोन केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममतांनी पवारांना मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा स्वीकारू नये असे सांगितले आहे. यावेळी पवार यांनी नारदा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मंत्र्यांना हटवण्याबाबत विचारणा केली. या कारवाईविरोधात मी आणि पक्ष तुमच्यासोबत असल्याचे ममता म्हणाल्या. मलिकांच्या अटकेनंतर टीएमसी प्रमुखांनी विरोधी एकजुटीची भाषा केली आहे. नवाब मलिक यांच्या भावानेही राष्ट्रवादीच्या प्रमुखांची भेट घेतली आहे. संपूर्ण पक्ष नवाब मलिक यांच्या पाठीशी उभा असल्याचे पवार यांनी सांगितले.
तत्पूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने बुधवारी सकाळी 7.45 वाजता त्यांना मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते, त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे. मलिकांना अटक केल्यानंतर ईडीच्या पथकाने त्यांना रुग्णालयात नेले, जिथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली.
कोर्टातील सुनावणीचे अपडेट्स...
शरद पवारांची उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा, गृहमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत नवाब मलिक यांच्या अटकेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे मानले जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नवाबच्या अटकेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
झुकेंगे नहीं लडेंगे और जितेंगे! - मलिक
तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. झुकेंगे नहीं लडेंगे और जितेंगे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली. नवाब मलिक यांचे जेजे रुग्णालयात मेडिकल होईल. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, अशी माहिती आहे.
अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ
नवाब मलिकच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, हे खालच्या पातळीवरचे राजकारण आहे. केंद्रीय एजन्सी जाणूनबुजून लोकांना त्रास देत आहे.
तर दुसरीकडे भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मलिक यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
आता अनिल परबांचा नंबर - किरीट सोमय्या
अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक आणि तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही दादागिरी केली तरी आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
ईडी कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त
मिळालेल्या माहितीनूसार, ईडीचे पथक मलिकांच्या निवासस्थानी पहाटे 5 ते 6 दरम्यान गेले होते. त्यानंतर 7 वाजेदरम्यान पथक मलिकांच्या घरातून बाहेर पडले आणि 7.45 वाजता ईडीचे पथक कार्यालयात हजर झाले. यादरम्यान ईडीने आपल्या सोबत सीआरपीएफची एक टीम देखील सोबत आणली होती. मलिकांनी ईडीने चौकशीसाठी नेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
अंडरवर्ल्डच्या टोळीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप
9 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा खळबळजनक खुलासा केला होता. नवाब मलिकने दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केल्याचे फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. ही जमिन मुंबईतील अंडरवर्ल्ड टोळीच्या मालकीच्या आहेत. सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांचे निकटवर्तीय सलीम पटेल यांच्याशी नवाब मलिकांचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. या दोघांनी मुंबईतील एलबीएस रोडवरील कोटय़वधींची जमीन नवाब मलिक यांच्या नातेवाईकाच्या (Solidus company)एका कंपनीला अत्यल्प कमी दरात विकली होती.
फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांनी विकली होती. नवाब मलिकदेखील काही काळ या कंपनीशी संबंधित होते. कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील 3 एकर जमीन केवळ 20-30 लाखांना विकली गेली, तर त्याची बाजारभाव 3.50 कोटींहून अधिक होती. आपण सर्व पुरावे केंद्रीय यंत्रणांना देणार असल्याचे देखील फडणवीस म्हणाले होते. याच प्रकरणात कारवाई करताना ईडीच्या पथकाने मलिक यांना चौकशीसाठी उचलले असल्याचे समजते. मात्र, यावर ईडीकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी
दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरची आज ईडी कोठडी संपणार आहे. त्यापूर्वी मलिकांना ईडीने चौकशीसाठी नेले आहे. मिळालेल्या माहितीनूसार, इकबाल कासकरने चौकशीदरम्यान, नवाब मलिकांचे नाव घेतल्याचे कळते. ईडी सध्या दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी करत आहे. याचप्रकरणी कासकरला सात दिवस ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, कासकर आणि मलिक या दोघात झालेल्या जमीन व्यवहाराचे काही पुरावे ईडीला मिळाले आहेत. याप्रकरणी ईडीने आणखी दोन बिल्डरांना देखील समन्स बजावले आहे.
कधीना-कधी हे होणारच होते- खासदार शरद पवार
मलिकांवर कारवाई होईल याची कल्पनाही नव्हती. नवाब मलिक हे विरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. हे काही नवीन नाही. कधीना कधी हे होणारच होते. असे पवार म्हणाले.
जे-जे विरोधात त्यांच्यावर ईडीच्या कारवाया- खासदार सुप्रिया सुळे
नवाब मलिक हे एक कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारे ईडीने नोटीस पाठवली नाही. देशामध्ये जे-जे विरोधक आहेत, त्यांना ईडीकडून त्रास देण्याचे सत्र सुरू आहे. नवाब मलिक सत्य बोलत आलेले आहेत, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
आर्यन खान प्रकरणातून मलिक अडचणीत?- माजिद मेमन
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणानंतर मलिकांनी वारंवार ईडीच्या चौकशीवर संशय व्यक्त केला होता. त्यांनी ईडीचे मुंबईतील माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हापासून मलिक यांच्यामागे ईडी लागली आहे. त्याचा गुन्हा फक्त एवढाच आहे की, त्यांनी समीर वानखेडेंचा भांडाफोड केला. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी दिली आहे.
हे सुडाचे राजकारण- हसन मुश्रीफ
जे सत्य बोलतात त्यांच्या मागे ईडी लावली जाते, हे सुडाचे राजकारण राज्यात सुरू आहे. अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, सत्तेसाठी भाजप कधी शिवसेनेच्या, कधी राष्ट्रवादीच्या, कधी काँग्रेसच्या पक्षांच्या नेत्यांपाठीपाठे ईडी लावत आहे.
मलिकांना जाणिवपूर्वक त्रास देण्याचे काम सुरू- जयंत पाटील
कोणतीही माहिती न देता घेऊन जाणे, ही चुकीचे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. नवाब मलिक यांना जाणूनबुजून त्रास देण्याचे काम ईडी करत आहे. असे पाटील म्हणाले.
आणखी काही अपडेट्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.