आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईडीचे पुढचे टार्गेट शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहनमंत्री अनिल परब असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या सांगत आहेत. मात्र, नवाब मलिक यांच्या अटकेने आणि आघाडीच्या प्रत्युत्तराच्या जोराच्या हालचाली पाहता ईडीच्या कारवाया काही महिने तरी थंड होतील, असा अंदाज बांधला जातो आहे. परिणामी राऊत आणि परब सध्या वाचल्याचा दावा आघाडीचे नेते करत असले तरी दोन्ही नेते रडावर असल्याचे सांगण्यात येते.
नवाब मलिक थेटपणे भाजप नेते व ईडीवर आराेप करत होते, ते पाहता त्यांच्यावर कारवाई होणार हे अपेक्षित हाेते. आम्हाला आव्हान देणाऱ्यांचे आम्ही काय करतो, असा संदेश मलिकांची अटक करून भाजपने दिल्याचे आघाडीचे नेते सांगतात. मलिक यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि संजय राऊत यांचा नंबर असल्याचे आज स्पष्ट केले. मलिक यांच्या अटकेनंतर सत्ताधारी महाविकास आघाडीने संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. तिन्ही पक्षांनी आज एकत्र बैठक घेऊन केंद्राशी व भाजपशी दोन हात करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या मंत्र्यांकडे इतक्यात ईडीचा मोर्चा वळणार नसल्याचा दावा शिवसेनेतील एका मंत्र्याने केला. १० मार्चनंतर पाहा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सातत्याने बजावत आहेत. १० मार्चला ५ राज्यांतील निवडणुकांचा निकाल आहे. त्यामध्ये भाजपची सरशी झाल्यास भाजपविरोधी सरकारे असलेल्या राज्यात केंद्राच्या कारवाया गतिमान होऊ शकतात. परिणामी, महाराष्ट्रातील ईडीच्या कारवाई यापुढे सुरूच राहतील, असा काँग्रेसमध्ये एकूण सूर आहे.
परबांविरोधात पुरावा नाही
अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. मात्र, परब यांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी पैशाच्या वळवावळवीचा पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे परब यांची अटक होईल, असे वाटत नसल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची ४ कोटी २५ लाख रुपयांची पैशाची वळवावळवी ईडीला आढळली होती. मात्र परबांविषयी पुरावा नसल्याने सेना निश्चित असल्याचे सांगण्यात येते.
१ पोलिस दलातील बदल्या थांबवण्यासाठी अनिल परब यांना २० कोटी मिळाले. तसेच मुंबई पालिकेतील ५० ठेकेदारांकडून प्रत्येकी २ कोटी आणि भेंडी बाजाराचा पुनर्विकास करत विकासकाकडून ५० कोटी घेण्याचे आदेश परब यांनी दिल्याचा जबाब निलंबित सचिन वाझे यांनी ईडीला दिला आहे.
२ गोरेगाव येथील भूखंड विक्रीत १ हजार ३४ कोटी रुपयांच्या एफएसआयचा घोटाळा केल्याप्रकरणी उद्योजक प्रवीण राऊत यांंना ईडीने अटक केली. प्रवीण हे संजय राऊत यांचे नातेवाईक असून संजय राऊत यांनी प्रवीणकडून ५० लाख रुपये हातउसने बिनव्याजी घेतल्याचे ईडीला आढळले.
नेते काय म्हणतात
२० वर्षांनी चौकशी कशी : राऊत
मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत जे सातत्याने बोलत आहेत, मुखवटे ओरबाडून काढत आहेत, त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावली जात आहे. एखाद्या गोष्टीची वीस वर्षांनी कशी चौकशी होते, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू. ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार समोर आणू. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
यंत्रणांचा दुरुपयोग : जयंत पाटील
केंद्र सरकारविरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. भाजपचा हा नवा धंदा आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. आम्ही याविरोधात सामूहिक लढा देणार आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
सूडबुद्धीने कारवाई : नाना पटोले
मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाई सूडबुद्धीने केलेली आहे. मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून आम्ही मलिक यांच्या पाठीशी आहोत, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.
नोटीस बंधनकारक : वळसे पाटील
नवाब मलिकांना चाैकशीला बोलावण्यापूर्वी नोटीस देणे बंधनकारक होते. त्यानंतर चौकशीला बोलावले पाहिजे होते, असा दावा वळसे पाटील यांनी केला.
हे सुडाचे राजकारण : दलवाई
हे सूडाचे राजकारण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना हे शिकवले. गोडसेंची विचारधारा अंगीकारून ते नेहमी राजकारण करतात. हा प्रश्न मलिकांपुरता नाही, असा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला.
बोलणाऱ्यांची बोलती बंद : पाटील
ईडी स्वतंत्र तपास यंत्रणा असून त्याची नाेटीस आल्यानंतर काेणी घाबरून जाण्याचे कारण नाही कारण ‘कर नाही त्याला डर कशाला’ , असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
जाहीरपणे बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर
मुंबई | अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ‘ईडी’ची कारवाई करणार याची पुसट कल्पना होती, आमच्यासाठी हे आश्चर्यकारक नाही. जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि भाजप यांच्यावर बुधवारी (२३ फेब्रुवारी) केला. माझ्यावरही अशा प्रकारचे आरोप झाले होते, पण ते सिद्ध करू शकले नाहीत, असे पवार यांनी स्पष्ट केले. बुधवारी सकाळी ७ वाजता ईडीचे अधिकारी मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पोहोचले. चौकशीसाठी त्यांना बेलार्ड पिअर येथील ईडी कार्यालयात आणण्यात आले. मलिक यांच्या ईडी कारवाईवर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चौफेर टीका केली आहे. शरद पवार म्हणाले की, कुणी मुस्लिम कार्यकर्ता असला की दाऊदचे नाव घ्यायचे आणि आरोप करायचे, यात काही नवीन नाही. खरे काय हे कुणालाही माहिती नसते. राज्यात असे वातावरण निर्माण केले होते. आज त्या गोष्टीला २५ वर्षे झाली. पण आजही तशीच नावे घेऊन लोकांना बदनाम करण्यासाठी सत्तेचा गैरवापर होत आहे.
मलिकांचा राजीनामा नाही; आघाडीत निर्णय
रोज उठून विरोधक एका मंत्र्यांवर आरोप करतील. आपण कुठवर राजिनामे द्यायचे? जोपर्यंत दोषसिद्धी होत नाही, तोपर्यंत यापुढे मंत्र्यांचा राजिनामा घ्यायचा नाही. यापूर्वीच्या घटनांशी तुलना करायची नाही. आरोप होणाऱ्या मत्र्यांच्या पाठिशी आघाडी म्हणून खंबीर उभे राहायचे, असा निर्णय शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
अल्पसंख्यांक विकास मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकार व भाजपा नेत्यांच्या चुकीच्या गोष्टींचा भांडाफोड केला. म्हणून ३० वर्षापूर्वीचे प्रकरण काढून त्यांना अटक करण्यात आली. लोकशाहीचे तोंड बंद करण्याचा हा प्रकार असून याचा निषेध म्हणून गुरुवारी (ता.२४) मंत्रालयाशेजारच्या गांधी पुतळयाजवळ आघाडीचे मंत्री, आमदार आंदोलन करणार आहेत. तसा निर्णय बुधवारी (ता.२३) मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, शुक्रवारी संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मलिक यांच्या अटकेविरोधात शांततापूर्ण आंदोलन करतील. मलिक यांच्यावरील कारवाई सूडापोटी करण्यात आली आहे. जोपर्यंत न्यायालयात दोषसिद्धी होत नाही, तोपर्यंत प्रत्येक जण निर्दोष असतो. त्यामुळे मलिक यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले. मलिक यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील कोणत्याही आरोपींशी संबंध नाही, असेही ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले होते
“१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी शहा वली खान व मोहंमद सलीम ऊर्फ इशाक पटेल यांच्याकडून मलिकांच्या कुटुंबाने जमीन खरेदी करून देशविरोधी कृत्य केले आहे. त्यांच्या चार जमीन खरेदीपैकी दोन व्यवहारांचे पुरावे आपल्याकडे असून आपण ते ईडीकडे सुपूर्द करणार आहोत.
मलिकांनी केला होता खुलासा
“आम्ही गोवावाला कंपाउंडमध्ये भाड्याने राहत होतो. तेथे ३०० भाडेकरू होतो. शहा वली खानचे वडील तेथे वॉचमन होते. सलीम पटेल व शहा वली खान याच्याकडून आम्ही २००५ साली जमीन खरेदी केली तेव्हा ते अंडरवर्ल्डशी जोडलेेले आहेत हे आम्हाला माहीत नव्हते.
वानखेडे प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक भाजपच्या नेत्यांविरोधात आरोप करत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ९ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्या विरोधातील पुरावे ईडीकडे देणार असल्याचे जाहीर केले होते.
य आहेत आरोप : २०५० चौरस फूटाची जमीन खरेदी
अंडरवर्ल्डचा पैसा मलिकांच्या माध्यमातून जमिनीच्या व्यवहारात गुंतवला जात असल्याची ईडीचा आरोप आहे. मलिक हे दाऊदची बहीण हसीना पारकरचे हस्तक असल्याचा आरोप ईडीने न्यायालयात केला आहे.
एनआयएनेदेखील इब्राहिम कासकरविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला आहे. यात मलिक यांचा नाव पुढे येण्याची, जोडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सन २००५ मध्ये मलिकांशी संबंधित सॉलिडस या कंपनीने कुर्ल्यात गोवावाला कंपाउंड येथील २०५० चौरस फूटाची जमीन खरेदी केली. यातील शहा वली खान हा मुंबई स्फोटातील आरोपी असून सलीम पटेल हा डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा सुरक्षा रक्षक आहे.
रायगड | मंत्रिमंडळात अनेक गँग आहेत. डी नाही तर बी आणि सी गँगसुद्धा आहेत. नवाब मलिक यांच्यानंतर सर्वांचा नंबर लागणार आहे, असे सूचक विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केले. संजय राऊत हे शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत. माझ्या घरांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे.
नवाब मलिक हे काय बोलत होते, आता त्यांची बोलती बंद झाली असेल. आम्ही हे अनेक दिवस बोलत होतो आणि हे होणारच होते, नवाब मलिक यांचेच संबंध नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळात डी काय, बी काय, सी काय, सगळी माणसे आहेत. आता क्रमाने एक-एक आत जाणार, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.