आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझेंना दिले असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान गृहमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरीही राज्यात राजकीय वादळ आले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया या दिली आहे.
शरद पवार याविषयी बोलताना म्हणाले की, 'अनिल देशमुखांवर लावलेले आरोप गंभीर आहेत. परमबीर सिंह यांच्या पत्राचे दोन भाग आहेत. एक मोहन डेलकर प्रकरणावर आहे तर दुसरा वाझे प्रकरणावर आहे. दरम्यान या पत्रामध्ये देशमुखांवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
पैसे गोळा कसे केले जातात हे पत्रात लिहिलेले नाही
पवार म्हणाले की, 'परमबीर सिंहांनी मला आणि मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवले आहे. त्यात यांनी लिहिलेय की, गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट वाझेंना दिले होते. मात्र त्यांनी या पत्रामध्ये पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद केलेले नाही.'
देशमुखांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी
पवार पुढे म्हणाले की, 'वाझेंना पुन्हा पोलिस दलात घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंहांचाच होता. वाझेंना घेण्याचा निर्णय गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांचा नव्हता. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जावी. यासोबतच देशमुखांची बाजुही ऐकूण घ्यायला हवी.'
गृहमंत्र्यांविषयी उद्यापर्यंत निर्णय घेऊ
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन याविषयावर योग्य निर्णय घेतला जाईल असे शरद पवार म्हणाले आहेत. ते म्हणाले की, 'मी आत्ता आग्र्यावरुन आलो आहे. मी माझ्या सहकाऱ्यांशी देखील चर्चा केलेली नाही. चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच गृहमंत्री पदाचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे. याविषयी चर्चा करुन उद्यापर्यंत निर्णय घेतला जाईल.'
आघाडी सरकार स्थिर आहे
दरम्यान परमबीर सिंहांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा मागितला जात आहे. तसेच आघाडी सरकारवर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. यामुळे सरकार धोक्यात आले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यामध्ये कोणालाही यश येणार नाही. सरकारला कोणताही धोका नाही, सरकार हे स्थिर आहे.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.