आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवारांचा एक दिवसाचा अन्नत्याग सत्याग्रह:मतदानावेळी राज्यसभेत नरमाई, मात्र कृषी विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध; मराठा आरक्षणाबाबत बैठकीमुळे राज्यसभेत गैरहजर असल्याचा शरद पवारांचा खुलासा

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृषी विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध नसल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा

राज्यसभेत रविवारी कृषी संदर्भात पारित झालेल्या विधेयकांच्या चर्चेदरम्यान मी उपस्थित राहू शकलो नाही, मात्र दोन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रवादीचा विरोध असून निलंबित खासदारांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचा अन्न सत्याग्रह करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सांगितले. दरम्यान, शरद पवारांनी कृषी विधेयकाला विरोध दर्शवला नसून खासदारांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईबद्दल त्यांनी विरोधी पक्षांना पाठिंबा दिला आहे, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत आपण लोकसभेत अजूनही विरोधकांबरोबरच आहोत, अशी ग्वाही दिली. तसेच राज्यसभा उपसभापतींचे सभागृहातील वर्तन आणि केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही त्यांनी टिका केली. ते म्हणाले, मी सभागृहात ५० वर्षापेक्षा जास्त काम केले. पण, पीठासीन अध्यक्षांकडून असे वर्तन मी आजपर्यंत पाहिलेले नाही.

बिहारमधील एक अत्यंत ज्येष्ठ नेते आणि संसदीय पद्धतीचे जाणकार असलेल्या व्यक्तीकडून सभागृहाच्या नियमांना तिलांजली देण्याचे काम झाल्याबद्दल वाईट वाटले. विधेयकांवर सभागृहात किमान दोन - तीन दिवस चर्चा होते. तशी चर्चा होऊ शकली नाही, म्हणजे होऊ दिली नाही. आवाजी मताने विधेयके गोंधळात मंजूर करण्याची वेळ मोदी सरकारवर का आली, असा सवालही पवार यांनी केला.

कृषी विधेयकाला विरोध करताना राष्ट्रवादी सभागृहात दिसली नाही, असा प्रश्न पत्रकारांनी केला. या विधेयकांवर राज्यसभेत प्रफुल पटेल आणि लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्टपणे मांडली. मी मराठा आरक्षणाचा बैठकीमुळे सभागृहात अनुपस्थित होतो, अशी सारवासारव पवारांनी केली.

शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाही : फडणवीस

नागपूर | पवार यांचा कृषी विधेयकाला विरोध नाही, असा दावा देवेन्द्र फडणवीस यांनी केला. पवारांनी पत्रकार परिषदेत विधेयकाला कुठेही विरोध केला नाही. संसदेत जे घडलेे, त्यात दोषी खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली. त्या निमित्ताने पवारांनी विरोधकांना पाठिंबा दिला असल्याचे फडणवीस म्हणाले. संसद सदस्यांनी अशोभनीय कृती केली नसती तर शरद पवारांना उपवास करावा लागला नसता, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

राष्ट्रवादीची संशयास्पद भूमिका, काँग्रेस नाराज

> राज्यसभेत कृषी विधेयकाला विरोध केल्याबाबत जे ८ सदस्य निलंबित झाले,त्यात राष्ट्रवादीचा खासदार नाही.

> दोन्ही कृषी विधेयके १४ सप्टेंबर रोजी सभागृहाच्या पटलावर सादर झाली होती, असे असताना एक दशक देशाचे कृषी मंत्रिपद सांभाळलेले पवार सभागृहात गैरहजर राहिले.

> नागरिकत्व सुधारणा विधेयकावेळीसुद्धा राष्ट्रवादीचे खासदार दोन्ही सभागृहात अनुपस्थित राहिले हाेते. राष्ट्रवादीच्या या संशयास्पद भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे.

पवारांना आयकर विभागाची नोटीस

शरद पवार यांना सन २००९,२०१४ आणि २०१९ अशा गेल्या तीन िनवडणुकातील शपथपत्राबाबत आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. काल संध्याकाळपर्यंत सुप्रियाला नोटीस येईल असे मी ऐकत होतो. चांगली गोष्ट आहे. देशातील इतक्या खासदारांमध्ये आमच्याबद्दल प्रेम आहे. त्याबद्दल आनंद झाला, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला चिमटा काढला.

बातम्या आणखी आहेत...