आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शरद पवारांचे रोखठोक मत:राफेल विमानांमुळे चीनची चिंता वाढेल असं मला वाटत नाही, हे गेमचेंजर वगैरे ठरणार नाही - शरद पवार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लष्करी ताकदीच्या बाबतीत चीनशी आपली तुलना होणे शक्य नाही

राफेल फायटर विमानांची पहिली तुकडी आज भारताच्या हवाई हद्दीत सामिल झाली आहे. भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर अरबी समुद्रात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेकडून राफेल वैमानिकांचे जोरदार स्वागत करण्यात आले. राफेल विमान गेमचेंजर ठरतील असे भाजपाकडून म्हटले जात आहे. आता यावर राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राफेल विमानांमुळे चीनची चिंता वाढेल असं मला वाटत नाही, हे गेमचेंजर वगैरे ठरणार नाही. असं ते म्हणाले आहेत. 'सीएनएन न्यूज 18' या वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी आपले मत मांडले आहे.

शरद पवार याविषयी बोलताना म्हणाले की, 'राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होत आहेत. ही आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. मात्र, ही विमाने गेमचेंजर वगैरे ठरणार नाहीत. त्यामुळं चीनची चिंता वाढेल असं मला वाटत नाहीत. राफेल आल्यामुळं चुटकीसरशी आपल्या सर्व चिंता मिटतील असा जो काही समज पसरवला जातोय तो चुकीचा आहे,'असं म शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, 'भारताच्या संरक्षण सिद्धतेकडे आणि तयारीकडे चीन गंभीरपणे पाहत असेल यात शंका नाही. मात्र, राफेल आल्यामुळं चीनची चिंता वाढेल, असं मला वाटत नाही. चीनची ताकद आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. लष्करी ताकदीच्या बाबतीत त्यांच्याशी आपली तुलना होणे शक्य नाही. आपल्याकडे दहा लढाऊ विमानं असतील तर त्यांच्याकडे हजार विमानं आहेत. एवढा फरक आहे असंही पवारांनी स्पष्ट केलं.