आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कृषिमंत्री सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतिसंह कोश्यारींकडे केली.
आता हद्द झाली
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी नेत्यांनी आज राज्यपालांना याबाबत निवेदन दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सत्तार यांनी भाषेची सर्व मर्यादा ओलांडली आहे. आता हद्द झाली आहे. अशा व्यक्तीचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश असावा का, यावर विचार होणे आवश्यक आहे.
फडणवीसांचे मौन का?
जयंत पाटील म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंवर ज्या शब्दांत टीका केली, ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का? मान्य नसेल तर त्यांनी ताबडतोब सत्तारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. आणि सत्तारांचे वक्तव्य मान्य असेल तर तसे जाहीर करावे.
संस्कारांना काळीमा फासण्याचे कम
राष्ट्रवादीने राज्यपालांना निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथली माती, इथली संस्कृती आणि परंपरा ही आईसमान समजली जाते. स्त्रित्वाचा आदर करून स्त्री सन्मानाचा पुरस्कार करणारा महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीदेवी फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि माता रमाईच्या लेकींचा महाराष्ट्र म्हणून अभिमानाने गौरविला जातो. परंतु या आदर्शवत स्त्रियांच्या संस्कारांना काळिमा फासण्याचं काम आज महाराष्ट्रात झालं आहे.
मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पवित्र अशा संविधानाची शपथ घेऊन मंत्री म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे विद्यमान कृषिमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल उच्चारलेले आक्षेपार्ह शब्द व केलेले वक्तव्य याचा आम्ही जाहीरपणे तीव्र शब्दात निषेध करतो. एका महिलेला अशाप्रकारे शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याच्या एका जबाबदारीच्या पदावर राहण्याचा कुठलाही लाक्षणिक अधिकार नाही. तेव्हा महामहिम राज्यपालांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासून स्त्रित्वाचा अपमान करणाऱ्या कृषिमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांना तातडीने बडतर्फ करावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.