आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हाडांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर:म्हणाले - चुकीची माहिती देऊन महाराजांची बदनामी करणाऱ्यांची तुम्ही माफी मागीतली हा जातपातच

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''जेम्स लेनने ज्या पुस्तकाद्वारे शिवाजी महाराजांच्या पितृत्वाबद्दल शंका निर्माण केली. लेले, मेहंदळे, भंडारी यांनी जेम्स लेनला माहीती दिली. या सर्वांनी आमच्या आईची चुकीची माहिती द्यायची, महाराजांची बदनामी करायची आणि त्या सर्वांची तुम्ही जाऊन माफी मागीतली होती, यालाच जातपात म्हणतात'' असे प्रत्त्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.

जातीपातीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस करीत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राष्ट्रवादी काँंग्रेवर झालेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर शाब्दीक प्रतिहल्ला केला.

तुम्ही माफी मागीतली

आव्हाड म्हणाले, जात-पात-धर्म हे कुठल्या निकषांमध्ये मोजले जातात हेच मला कळत नाही. राष्ट्रवादीचा जन्म 1999 साली झाला. जेम्स लेनने 2003 मध्ये शिवाजी महाराजांच्या पितृत्वावर शंका निर्माण केली. त्या जेम्स लेनला लेले, मेहेंदळे, भंडारी यांनी माहीती दिली. त्यांची राज ठाकरे यांनी जाऊन माफी मागितली.

त्यांची तुम्ही बाजू घेतली

आव्हाड म्हणाले, आमच्या आईची चुकीची माहिती द्यायची, महाराजांची बदनामी करायची आणि तुम्ही त्यांची बाजू घ्यायची याला जातपात म्हणतात. तेव्हाही या लढाईत सगळ्यात आघाडीवर मी होतो. मी मराठा नाही, मागासवर्गीय आहे. मराठा हा शब्द महाराष्ट्राची ओळख आहे. तो आत्ता जातीपातींमध्ये आला आहे.

तेव्हा जातपात लक्षात आली नाही का?

आव्हाड म्हणाले, बाबासाहेब पुरंदरेंविरोधात आम्ही बोललो तेव्हा तुम्ही पुरंदरेंची बाजू घेतली. तेव्हा तुम्हाला जातपात लक्षात आली नाही का? हर हर महादेवमध्ये अतिशय विकृत चित्रण दाखवण्यात आले. तुम्ही शिवाजी महाराजांची बुद्धी, शौर्य या सर्वावर पाणी टाकले. नवीन एक जात, वर्ण, वर्चस्ववादाला सुरुवात केली, बाजीप्रभू देशपांडे महाराजांच्या तुलनेत होते आणि त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असे या चित्रपटात दाखवले. या चित्रपटाला तुम्ही पाठिंबा दिलात. मग कोणी जातीपातीचे राजकारण केले? सत्य लोकांसमोर यायला हवे.

जातीपातीचे राजकारण बोलण्यापुरते

आव्हाड म्हणाले, जातीपातीचे राजकारण वगैरे काही नसते. हे फक्त बोलण्यापुरते आहे. जेव्हा ते करतात तेव्हा ते बरोबर असते कारण ते महान आहेत. त्यांनी काहीही केलेले चालते. आता काळ बदलला आहे. सर्वच तुमच्या मनासारखे होईल, असे नाही होत. आता गोष्टी बदलल्या आहेत.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने जातीपातीचे राजकारण सुरू केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीने 1999 पासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू केले. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. मात्र, त्यांनी काही टोळ्या निर्माण केल्या आहेत. त्यांचा वापर करून मराठा व इतर समाजात फूट पाडली जाते. नंतर दोन्ही समाज आपल्या खिशात घालायचे, असे पवार यांचे राजकारण आहे.

बातम्या आणखी आहेत...