आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांचा पलटवार:म्हणाले - ईडीने बोलावल्यानंतर राजसाहेबांचे इंजिन वेगळ्या ट्रॅकवर गेले, त्यांचा कोहिनूर टॉवरच हलायला लागला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल आपल्या जाहीर सभेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत अनेक नेत्यांवर निशाणा साधला होता. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ हे काही स्वातंत्र्य लढ्यासाठी तुरूंगात गेले नव्हते. ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोन वर्षे तुरुगांत होते. तरीही राष्ट्रावादी काँग्रेसने सर्वप्रथम त्यांना मंत्रीपद दिले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर आज छगन भुजबळ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजसाहेबांचे काही कळतच नाही. ईडीमध्ये बोलावल्यानंतर त्यांचे इंजिन वेगळ्या ट्रॅकवर गेले. त्यांचा कोहिनूर टॉवर एकदमच हलायला लागला. त्यामुळे त्यांनी ट्रॅक बदलला असावा, अशी खोचक टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

मी कधी ट्रॅक बदलला नाही, म्हणून मंत्रीपद दिले!
राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, मी पुर्वीपासूनच भाजपवर टीका करत आहे. राज ठाकरेदेखील पुर्वी भाजपवर जोरदार टीका करायचे. मी दोन वर्षे तुरूंगात राहून आल्यावरही माझा ट्रॅक बदलला नाही. मी आजही भाजपवर टीका करतो. मात्र, राजसाहेबांचे काही कळत नाही. ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांचे इंजिन वेगळ्या ट्रॅकवर गेले आहे. त्यांचा कोहिनूर टॉवरच हलायला लागला आहे. त्यामुळेच एकेकाळी भाजपला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी काल अचानक ट्रॅक बदलला. तसेच, मी आताही भाजपला विरोध करतो. त्यामुळेच शपथविधीला मला पहिले पाचारण करण्यात आले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

ते काय बोलतात, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कळत नसेल!
राज ठाकरे काय बोलतात, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही समजत नसेल. केवळ चांगले बोलतात म्हणून लोक त्यांचं ऐकायला येत असतील, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर राज्यात जातीवाद वाढवल्याचा आरोप केला होता. त्यालाही छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जातीवाद, धर्मवाद कोणी वाढवला याचा हिशोब मोठा आहे. मात्र, राज्यात प्रांतवाद राज ठाकरे यांनीच वाढवला, असे भुजबळ म्हणाले.

भोंग्याबाबत भाजपला कायदे करायला सांगा!
देशात मशिदींवरील भोंग्याबाबत भाजपलाच कायदा करायला सांगा. राज्यात भाजपची सत्ता असताना भाजपने हा कायदा का केला नाही. अनेक राज्यांत भाजपची सत्ता असूनही तेथे असा कायदा का केला जात नाही, असा सवालही छगन भुजबळ यांनी केला. तसेच, आगामी मुंबई पालिकेच्या निमित्ताने ते भाजपसोबत जाऊ शकतात. मात्र, भाजप त्यांना सोबत घेते की नाही हे बघावे लागेल, असा टोलाही भुजबळ यांनी हाणला.

बातम्या आणखी आहेत...