आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीत ठरली रणनीती:ईडीच्या रडारवरील राष्ट्रवादी आता भाजप-शिंदेंच्या मंत्र्यांना घेरणार! अधिवेशनात आक्रमक पवित्रा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोटनिवडणुकाही लढवणार

ईडी, आयकर या केंद्रीय तपास यंत्रणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिकांवर छापे टाकून त्यांना तुरुंगात डांबले. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे कुटुंबीय, कोल्हापूरचे माजी मंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तांवरही छापे टाकले. अजूनही या पक्षाचे काही नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. भाजपचे नेतृत्व सत्तेचा गैरवापर करून ही कारवाई करत असल्याचा आरोप पक्षाध्यक्ष शरद पवारांसह अनेक पक्षनेत्यांनी केला. तरीही कारवायांचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे आता भाजपलाच घेरण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप-शिंदेसेनेच्या मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढू, पुण्याच्या दोन्ही पोटनिवडणुकांत मविआचे जे उमेदवार उतरतील त्यांच्यासाठी काम करून भाजपला हरवू, अशी रणनीती बुधवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत ठरवण्यात आली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मला कधीही अटक होऊ शकते’
राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी बुधवारी एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, ‘केंद्रातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मला धक्कादायक माहिती दिली की कोणत्याही क्षणी मला अटक होऊ शकते. ठाणे मनपा निवडणूक होईपर्यंत किंवा त्यानंतरही काही महिने मला आत ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. खरे तर माझ्याविरोधात एकही केस नाही तरीही अशी कारवाई होणार असल्याचे एेकून आश्चर्य वाटले. ही खळबळजनक माहिती पत्रकारांना दिल्यानंतर आव्हाड सह्याद्री अतिथीगृहाकडे रवाना झाले. तेथे ते मुख्यमंत्र्यांना भेटले असल्याचीही चर्चा होती. मात्र स्वत: आव्हाड यांनी त्याचे खंडन केले. ते म्हणाले, ‘नगरविकास विभागाशी संबंधित माझे एक काम असल्याने मी तिथे प्रधान सचिव भूषण गगराणी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना भेटलो नाही.’ दरम्यान, ‘हर हर महादेव’ सिनेमाचा शो बंद पाडण्यासाठी ठाण्याच्या मॉलमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नोव्हेंबर महिन्यात आव्हाडांना अटक झाली होती. तसेच त्यांच्यावर एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.

मुश्रीफांच्या ताब्यातील संस्थांवर २० दिवसांत दुसऱ्यांदा ईडी छापे
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताब्यातील कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेत, कागल तालुक्यातील सेनापती कापशीच्या शाखेत बुधवारी ईडीच्या पथकाने छापे टाकून तेथील कागदपत्रे तपासली. संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या माध्यमातून मुश्रीफांनी १०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली होती. त्याआधारे यापूर्वी ११ जानेवारी रोजीही मुश्रीफांसह त्यांच्या नातलगांच्या घरी छापे टाकले होते.

आव्हाडांना अटक झाली तरी खचून न जाता आक्रमक व्हा : अजित पवार
कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक मविआ एकत्र लढणार आहे. तिथे उमेदवार कोण असतील हे दोन दिवसांत शिवसेना व काँग्रेसशी चर्चा करून ठरवू, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बैठकीनंतर म्हणाले. अजित पवार म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांना अटक होण्याची शक्यता असली तरी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता मनपा निवडणुकीची तयारी करावी. आमदारांनी विधिमंडळ आणि बाहेरही आक्रमक भूमिका घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...