आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी:सिल्व्हर ओकवर फोन करणारा निघाला वेडसर; पोलिसांनी केलेल्या चौकशीत माहिती उघड

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांचा नुकताच 12 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा झाला. त्यामुळे त्यांना आलेल्या या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती वेडसर असल्याचे पोलिस तपासामध्ये समोर आले आहे.

शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर अज्ञात व्यक्तीने फोनवरून पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली असून पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांत अज्ञाताविरोधात भादंवि कलम 294, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवारांना धमकी देणाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा.
पवारांना धमकी देणाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा.

पोलिसांनी संबंधिताला शोधले

शरद पवारांना धमकीचे फोन देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी शोधले आहे. हा इसम वेडसर असल्याचे समजते. मात्र, तो वारंवार फोन करून त्रास देतो. त्यामुळे पवार कुटुंबांनाही त्रास होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शरद पवार यांच्या सचिवाने पोलिसांकडे पत्र देवून केली आहे.

पवारांच्या सचिवांचे पत्र

शरद पवारांचे सचिव सतीश राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना एक पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शरदश्चंद्र पवार, खासदार (राज्यसभा) तथा माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मुंबई येथील २, सिल्व्हर ओक ह्या निवासस्थानी क्र. ०२२२३५१५२२२ व ०२२२३५२५२४४ हे दोन दूरध्वनी आहेत. सदर दूरध्वनी क्रमांकापैकी ०२२२३५१५२२२ ह्या क्रमांकावर ०९३४१३९७०६६ ह्या मोबाईल क्रमांकावरून नारायण सोनी ह्या इसमाकडून वारंवार फोन येत असतात. त्याचे संभाषण अतिशय गलिच्छ भाषेतील असून दिवासाकाठी सुमारे २०-२५ वेळा हा उपद्रव चालू असतो. संभाषण हिंदी ग्राम्य भाषेत असून अपमानकारक शब्दांचा शिव्यांचा सर्रास वापर केला जातो. दैनंदिन कामात अडथळा निर्माण होतो. विशेष म्हणजे अतिमहत्वाच्या व संरक्षित व्यक्तीच्या बाबतीत असे वारंवार घडत आहे.

कारवाईची मागणी

पत्रात पुढे म्हटले आहे की, सदर उपद्रवाबाबत यापूर्वी गांवदेवी पोलिस ठाणे व मा. सहआयुक्त (गुन्हे) यांना कल्पना दिली होती. पोलिस यंत्रणेने सदर इसमाचे नाव व पत्ता देखील शोधला होता. चौकशीअंती हा इसम वेडसर असल्याचे व उत्तरेकडील राज्यांतील असल्याचे समजले होते. परंतू दुर्दैवाने उपरोक्त इसमाच्या कृतीला पायबंद घातला जात नसून दिवसोंदिवस असह्य उपद्रव वाढतो आहे. दीपावलीच्या दरम्यान दिवसाला १०० वेळा असे कॉल करून त्याने उपद्रवाची परिसीमा गाठली. सदर इसम वेडसर असल्याने पुरेसी कारवाई होत नाही असे समजते. परंतू त्यामुळे आदरणीय श्री. शरदचंद्र पवार, खासदार (राज्यसभा) यांना होणारा उपद्रव थांबत नाही. आपणास विनंती की, सदर इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर परिणामकारक कायदेशीर कारवाई व्हावी जेणेकरून दूरध्वनीवरून होणारा उपद्रव बंद व्हावा.

शरद पवारांच्या पोलिसांचे मुंबई पोलिसांना पत्र.
शरद पवारांच्या पोलिसांचे मुंबई पोलिसांना पत्र.

रिपोर्ट्सनुसार, फोन कॉल बिहारमधून आला होता. यापूर्वीही त्याच व्यक्तीने पवारांना धमकी दिली होती. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती आणि समजूत घालून सोडून दिले होते. आता पुन्हा एकदा त्याच व्यक्तीने धमकी दिली आहे. शरद पवारांचे सचिव सतीश राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार फोन करणाऱ्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. असे प्रकार त्याने याआधीही केले आहेत.

सीमावादावर आक्रमक भूमिका

सीमावाद चिघळलेला असताना शरद पवार यांनी सात दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते की, सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या वाहनांवर होणारे हल्ले 24 तासांत हल्ले थांबले नाहीत, तर बेळगावला जाऊ. बोम्मईंच्या वक्तव्याने देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होतोय. हे पाहता केंद्र सरकारला आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असेही त्यांनी केंद्र सरकारला सुनावले होते. तसेच इतके होऊनही महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका संयमाची राहिली. परंतु संयमालाही मर्यादा असतात, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर ही धमकी आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती.

नुकताच झाला वाढदिवस

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नुकताच 82वा वाढदिवस साजरा झाला. यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पवारांनी नुकतेच चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेवरही भाष्य केले होते. वक्तव्ये करताना आपण देशाचे नेतृत्व करत आहोत, याचे भान ठेवा असे खडे बोलही पवारांनी सुनावले होते. तसेच शाईफेकीची घटना ही चुकीचीच असून तिचे कधीही समर्थन होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...