आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलेबाजी:राज्यपाल नियुक्तीबाबत निकष ठरवण्याची गरज ; मुख्यमंत्र्यांनी बेळगावसाठी नवस करावा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी-दूत असतात. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत जसे प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्याचप्रकारे राज्यपालांची नियुक्ती ही कोणत्या आधारावर केली जावी याचेही निकष ठरवले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात भूमिका घेणारे खासदार उदयनराजे भोसले यांना उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले. महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना शिवछत्रपतींच्या अाग्य्राहून सुटकेशी केली आणि अजूनही ते मंत्रिपदावर राहत असतील तर महाराष्ट्र काय आहे, दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही ते लवकरच दाखवणार असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवले पाहिजे, या मागणीवर सर्व विरोधक ठाम आहेत.

त्यासाठी केंद्राला अवधी दिला आहे. तोपर्यंत निर्णय नाही झाला तर सगळे विरोधक मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगत राज्यव्यापी बंदचे संकेत उद्धव यांनी दिले. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या प्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक होत असताना आमच्या राज्याचे मुख्यमंत्री शांत कसे? नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले मग बेळगाव महाराष्ट्रात यावा यासाठी नवस का करत नाहीत, असा सणसणीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी (ता.३) केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हवण्यावर आम्ही ठाम असून लवकरच राज्यव्यापी निर्णय सर्व विरोधक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.सत्ताधाऱ्यांच्या गटांगळ्या कर्नाटकने सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याला पाणी दिले आहे, या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न केला असता, उद्धव म्हणाले की, कर्नाटकने आपल्या तलावांमध्ये पाणी सोडले आहे आणि आपले सत्ताधारी सत्तेच्या पाण्याखाली गटांगळ्या खात आहे. या नेभळटपणाविरुध्द आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले. त्यामुळे आता शिंदे गट यावर काय प्रतिक्रिया काय देतात हे पाहणेही गरजेचे आहे.

अॅड. प्रकाश आंबेडकरांसोबत लवकरच बैठक घेणार वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझी बैठक आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामध्ये सकारात्मक चर्चा होईल, असे सांगत शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याचे संकेत उद्धव यांनी या पत्रकार परिषदेत दिले. उद्धव ठाकरे यांनी बेळगाव सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेल्या मौनावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. वास्तविक प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे भवन असते. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकचे नाते काय हे अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलेले नाही. राज्याचे दोन मंत्री कर्नाटकमध्ये जाणार होते. पण कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या मंत्र्यांना येण्यास मज्जाव केला आहे. यावरही मुख्यमंत्री काही बोलले नाहीत, याकडे उद्धव यांनी लक्ष वेधले. दरम्यान, आता ठाकरे आणि आंबेडकर यांच्यामध्ये नेमके काय बोलणे होते हे पाहणेही महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...