आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नीला सत्यनारायण:वडिलांच्या इच्छेखातर IAS झाल्या नीला सत्यनारायण, भारतीय स्टेट बँकेच्या अधिकारी म्हणूनही झाली होती निवड, 6 जुलैला लिहिले 'हे' अखेरचे भावूक करणारे पत्र

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते. तसेच नीला सत्यनारायण या 1972 आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. त्या या सेवेत कशा उतरल्या? त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींविषयी जाणून घेऊया...

1965 साली संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या
नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मुंबई, पुणे, नाशिक येथे झाले. त्यांनी शालान्त परीक्षा दिल्ली बोर्डातून दिली. त्या परीक्षेत त्या 1965 साली संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. 1972 साली त्या आय.ए.एस.ची परीक्षा पास झाल्या.

वडिलांची इच्छा होती म्हणून उतरल्या सेवेत 
नीला सत्यनारायण या पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांची इच्छा होती म्हणून या सेवेत उतरल्या. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी  स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज अधिकारी भारत सोडून जाऊ लागले. प्रशासनात पोकळी निर्माण होऊ लागली. त्यामुळे आपल्या मुलांपैकी कुणी तरी भारतीय  प्रशासकीय अधिकारी व्हावं अशी त्यांचे वडील वासुदेव आबाजी मांडके यांची इच्छा होती. दरम्यान, नीला सत्यनारायण या इंग्रजी साहित्य घेऊन दिल्ली विद्यापिठातून बीए तर पुणे विद्यापिठातून एमए झाल्या. भारतीय स्टेट बँकेच्या अधिकारी आणि भारतीय प्रशासकीय अधिकारी अशा दोन्ही स्पर्धा परिक्षात त्या निवडल्या गेल्या. त्याकाळी बँकेची नोकरी अधिक आकर्षक होती तर प्रशासकीय नोकरी खडतर होती. पण वडिलांच्या इच्छेला मान देऊन त्या जुलै 1972 मध्ये भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून भारत सरकारच्या सेवेत दाखल झाल्या.

सनदी अधिकारपदाची 37 वर्षांची कारकिर्द
नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले.

महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त
प्रशासकीय सेवेत नीला सत्यनाराण यांनी सहायक जिल्हाधिकारी - नागपूर,    उपविभागीय अधिकारी - भिवंडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी - ठाणे,  पुढे मंत्रालयात  समाज कल्याण, सांस्कृतिक विकास व युवा कार्य, अन्न व नागरी पुरवठा, पर्यटन, वस्त्रोद्योग, महिला व बालविकास, सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क, गृह ,महसूल व वने आदी विभागात सचिव,प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव अशा चढत्या श्रेणीने स्वतःचा ठसा उमटवत पदे भूषविलीत. राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची पाच वर्षांची कारकीर्द लक्षणीय ठरली. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला. या काळात महिला लोकप्रतिनिधींनी सक्षमपणे काम करावं यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. 

आजवर 35 पुस्तकं झाली प्रकाशित 

नीला सत्यनाराण यांची प्रतिभा म्हणजे आजवर त्यांची 35 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यात 12 ललित पुस्तकं, 9 काव्य संग्रह, काही प्रेरणा दायी, काही अनुवादित पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या 2 कथांवर चित्रपट निर्माण  झाले आहेत. काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. 10 संगीत सीडी प्रकाशित असून काही चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांसाठीही त्यांनी गीतलेखन केलं आहे. नीला सत्यनारायण यांचा गतिमंद मुलगा चैतन्यवर ओतप्रोत प्रेमाने लिहिलेलं एक पूर्ण अपूर्ण हे स्वानुभवातू लिहिलेलं पुस्तक तर उद्योजक पती सत्यनारायण यांच्या जीवनावर लिहिलेलं  सत्य- कथा ही पुस्तकं नुसतीच गाजली नाही तर पालकांना, युवकांना सतत प्रेरणा देणारी आहेत. 

नीला सत्यनाराण यांनी 6 जुलै रोजी लिहिलेले अखेरचे पत्र 

150 कविता लिहिल्या

नीला सत्यनारायण यांनी 150 कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते. 

कोरोनाच्या या काळात केलेली एक कविता            
                       
भय                                                              
मला भय वाटत नाही ,                                      
बंदिस्त जगण्याचं ,                                               
भय वाटतं                                               
आजूबाजूला मिटत जाणाऱ्या                             
जगाचं -                                                         
उद्याची अशाश्वती                          
आणि वर्तमानातली                 
अस्वस्थता ,                           
मरूही देत नाही                          
आणि बळही देत नाही              
जगण्याचं...