आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगजेबाची घोषणा देणाऱ्यांवर 'एमपीडीए' लावा:छत्रपती संभाजीनगरप्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या औरंगाबादच्या नामांतराविरोधी खासदार इम्तियाज जलील यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनात औरंगजेबाचे फलक झळकले आणि औरंगजेबाच्या नावाने घोषणाबाजी झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घोषणा देणाऱ्यांवर 'एमपीडीए' लावा अशा सूचना दिल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 मार्चपासून खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी संघर्ष समितीतर्फे औरंगाबादच्या नामांतराविरोधात आंदोलन सुरू आहे.

दानवेंनी वेधले लक्ष

संभाजीनगरमध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आज विशेष बाब अंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे यांच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

गोऱ्हे यांचे निर्देश

सरकारकडून उत्तर देताना सांगण्यात आले की, या आक्षेपार्ह बाबीची शासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल. आजच गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. तसेच औरंगजेबाच समर्थीकरण व उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करून याबाबत तपासणी करण्यात यावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.

नेमके प्रकरण काय?

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्याविरोधात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. मात्र, उपोषणाच्या पहिल्याच दिवशी एका तरुणाने आंदोलनस्थळी औरंगजेबाचे फोटो, पोस्टर झळकावले. त्यानंतर आयोजकांनी या तरुणाला तिथून पिटाळले. यावेळी औरंगजेबाची घोषणाबाजी केल्याचा आरोपही झाला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मीर आरेफ अली मीर फारुक अली यांच्या फिर्यादीनुसार पाच मार्च रोजी अज्ञात चौघांविरोधात कलम-१५३ (अ), ३४ नुसार सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसराही गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या एका प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल चार मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घाटी परिसरातील एका चौकाला दिलेल्या वादग्रस्त नावावरून साजिद सईद शेख (२३ रा.चिकलठाणा) याच्या विरोधात मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जलीलांची भूमिका काय?

इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला आहे. कोर्टात याचिका दाखल असताना हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. तसेच आम्ही औरंगजेबाचे समर्थक नाही. आजपर्यंत औरंगजेबाचा एकही कार्यक्रम कधी शहरात साजरा केला नाही. शिवाय आंदोलनस्थळी फोटो झळकावणाऱ्यालाही आम्ही पिटाळले. यामागे दुसऱ्यांचाच हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

'एमआयएम'विरोधात आंदोलन

इम्तियाज जलील यांच्या आंदोलनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये सह्या करून आंदोलन केले. तर सकल हिंदू संघर्ष समितीने तापडिया नाट्यमंदिरात मेळावा घेतला. या मेळाव्याला सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इम्तियाज यांच्या नावाने बोंबा मारून निषेध व्यक्त केला होता.

सावेही झाले आक्रमक

इम्तियाज जलील यांच्या आंदोलनाला सहकार मंत्री अतुल सावे यांनीही विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले होते की, मुस्लीम समाजात कुणीही मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही, मग शहराच्या नावासाठी विरोध कशाला करता? अनेक वर्षांपासूनची नामांतराची मागणी पूर्ण झाली आहे. हा आनंदोत्सव साजरा व्हायला हवा. यात कुणी अडथळे आणत असेल तर मी तुमच्यासोबत आहे. जेथे गरज पडेल तेथे हजर राहीन.

कबर काढण्याची मागणी

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीचे अवशेषही नको. त्यामुळे खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर काढून टाकावी, अशी मागणी केली. तसेच यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालणार असल्याचे म्हणाले. तर आमदार प्रदीप जैस्वाल यांनी औरंगजेबाची कबर ओवेसींच्या घरासमोर नेऊन टाका, असे वक्तव्य केले होते.

बातम्या आणखी आहेत...