आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटस्ट्रीम:द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स - इरफानचे सुखद दर्शन

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इरफान खान विलक्षण प्रतिभावान अभिनेता होता. त्याच्या कसदार कारकीर्दीसाठी तो कायम स्मरणात राहील. त्याचा भारतातील पहिला मरणोत्तर थिएटर रिलिज सिनेमा ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ इंटरनेटवरील अन्य रिलीजनंतर झळकलाय. इरफान हा एक असा अभिनेता होता, ज्याच्या धीरगंभीर वर्तणुकीत अनामिक गूढता दडलेली होती! या चित्रपटाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल.

त्याच्या डेप्थचा अंदाज लवकर लागत नाही हेच खरे. २९ एप्रिलला इरफानच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अनुपसिंगचा ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ जवळपास पाच वर्षांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रदर्शनानंतर भारतात प्रदर्शित झालाय.

या सिनेमाचे सार त्यातील संगीतात आहे. विंचू चावलेल्या व्यक्तींवर संमोहनाद्वारे उपचार करण्यासाठी हे संगीत वाजवले जाते. ते अन्य व्यक्तींनी ऐकले, तर त्यांनाही काही अंशी संमोहन जाणवते! चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच निर्जन वाळवंटाची दृश्ये दिसतात. नायकाचे हरेक मार्ग वाळूने व्यापून टाकलेत. वाळूचे सीन सिनेमामधल्या स्थानिक लोकांच्या जीवनाला दिशाहीनतेची झालर लावतात, ज्यामुळे आपण अस्वस्थ होतो.

खरे तर ही एक प्रेमकथाच आहे, मात्र नेहमीच्या गोडगोड पानाफुलांच्या चित्रणाने नि सुखांत क्लायमॅक्सने ती समोर येत नाही. प्रारंभापासूनच सिनेमा फिलॉसॉफिकल वाटू लागतो. पण मुद्दलात विषय तसा नाहीय. दुखावल्या गेलेल्या दोन जीवांची ही समांतर पातळीवरची कथा आहे. जसजसा काळ पुढे जाऊ लागतो तसतशी त्यांच्यातली अपप्रवृत्ती समोर येऊ लागते. दोघांतला फरक ठळक होतो.

‘स्कॉर्पिअन्स’चे कथानक स्थिरावण्यात बराच वेळ खर्ची पडला असला, तरी सुखद चित्रीकरणाच्या जोडीने श्रवणीय संगीताचा आनंद मिळत असल्याने हा दोष झाकला जातो. कथेत दोन नायिका आहेत, ज्यांना काही असाधारण क्षमता प्राप्त असतात. त्यामुळे शहरात त्या लोकप्रिय असतात. दरम्यान, तिथे एका तरुणाला विंचूदंश होतो. विष इतकं पसरलेलं असतं की चोवीस तासांत त्याचा मृत्यू अटळ असतो. मात्र, त्या दोघींनी विंचूदंशाचे गीत गायल्यास तो वाचणार असतो. त्या दोघींची असामान्य क्षमता प्रेक्षकांसमोर सिद्ध करण्यासाठी अनुपसिंगला कुठलेही कष्ट घ्यावे लागले नाहीत. कथानक स्थिरावले की त्या कथेतली अंधारी बाजू तो अलगद समोर आणतो, जी पडद्यावर पाहणेच इष्ट ठरावे.

‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ हा चित्रपट सध्याच्या निरर्थक कंटेंटच्या भडिमारापासून सुटका मिळवून देतो. यातले राजस्थानी जनसमुदायाच्या भावभावनांचे चित्रण नवलाईचे आहे. सबटायटल काहीसे फसलेत, कारण सिनेमातली राजस्थानी बोली समजायला थोडीशी कठीण आहे. कथा वारंवार विषयाच्या भाष्याकडे नेण्याचा प्रयत्न करते. दृश्य परिणामकारकता काही ठिकाणी अफाट आहे. कथेतील काही स्पॉटवर तिला रोमांचक वळण लाभते.

त्यातील अंतर्निहित संदर्भांमुळे आणि उपकथनामुळे काही गोष्टी गैरभारतीय व्यक्तींना लवकर समजणार नाहीत. शिवाय, ज्यांना राजस्थानी ग्राम्य बोलीमधल्या शब्दांचा नेटका अर्थ माहिती नसेल, त्यांना यातली भाषा आक्षेपार्ह नि अश्लाघ्य वाटू शकते. अशांनी मोडक्या-तोडक्या सबटायटलची मदत नक्की घ्यावी. पिएट्रो झुअर्चर आणि कार्लोटा होली-स्टाइनमन या दुकलीने राजस्थानचे वाळवंट उत्तमरीत्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलंय. मेरी-पियरे फ्रेपियरने एडिटिंगही सुलभतेने केलंय.

इरफान खानला यापुढे नव्याने मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार नाही, ही जाणीव त्याच्या चाहत्यांना अस्वस्थ करू शकते. या चित्रपटात आदमच्या भूमिकेत तो फर्स्ट हाफमध्ये अगदी शांत-शालीन वाटतो. बोलक्या डोळ्यांमुळे त्याचं अस्तित्व उठून दिसतं. वाट्याला आलेल्या भूमिकेशी तो अगदी एकरूप होतो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. इथेही तो ही जादू करतो. त्याच्या एकमेवाद्वितीय ग्रेसफुल शैलीत तो अशी काही संवादफेक करतो की, आपण पुन्हा त्याच्या प्रेमात पडतो! नूरनच्या भूमिकेत गोलशिफ्तेह फराहानी उत्कृष्ट आहे.

इरफानच्या समोर नायिकेची भूमिका करणे सोपे काम नाही. तिच्या हिश्श्याला आलेल्या दृश्यांत ती चपखल शोभून दिसते. मागच्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रहमान यांनी साकारलेली झुबेदा खूपच छान आहे. त्यांच्या प्रत्येक फ्रेम देखण्या झाल्यात. त्यांना पाहणं हा एक निखळ आनंद! भारतीय चित्रपटाच्या सुवर्णकाळानं किती आणि काय काय अनुभवलंय, हे त्यावरून लक्षात यावं. इरफान खानला आपण त्याच्या अखेरच्या सिनेमात पाहतो आहोत, एवढे कारणही हा सिनेमा पाहायला पुरेसे ठरावे! अॅमेझॉन प्राइमवरती हा सिनेमा पाहता येईल.

जाता जाता... टोकदार हिंसाचार नि करंट सोशिओ-पॉलिटिकल प्रेझेन्स ज्यांना आवडतो, त्यांच्यासाठी सोनी लिव्हवरची ‘गरमी’ ही वेब सिरीज बरी आहे.

संपर्क : 9766833283 _photocaption_नेटस्ट्रीम*photocaption* समीर गायकवाड sameerbapu @gmail.com