आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:ठाणे जिल्ह्यातील भाजप-सेनेच्या नव्या मैत्रीने महाआघाडीत अस्वस्थता

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठाण्यातील 5 पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेची भाजपला पसंती

राज्याच्या सत्तेत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणारे शिवसेना आणि भाजप हे तीन दशकाचे जुने मित्र रविवारी ठाणे जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकत्र आले. राष्ट्रवादीने पारनेरमध्ये शिवसेनेच्या केलेल्या फोडाफोडीचा हा वचपा असल्याचे सांगण्यात येत असले तरी महाविकास आघाडीत यामुळे अस्वस्थता आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुका झाल्या. येथे राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात युती होण्याचे निश्चित होते. मात्र २ जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. त्याविषयी शिवसेनेत नाराजी होती. परिणामी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेने अचानक पवित्रा बदलून भाजपशी संधान साधल्याचे सांगण्यात येते.

कल्याणात भाजपचे ५, शिवसेनेचे ४ आणि राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. येथे सभापती व उपसभापती राष्ट्रवादीला देण्याचे शिवसेनेने निश्चित केले होते. मात्र मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी येथे शिवसेनेला विनाशर्त पाठिंबा दिला. परिणामी, सभापती व उपसभापतिपद शिवसेनेला मिळाले.

अंबरनाथमध्ये ५ सेनेचे, २ राष्ट्रवादीचे व १ भाजप सदस्य आहे. येथे राष्ट्रवादीला उपसभापतिपद देण्याचे निश्चित होते. मात्र शिवसेनेच्या सहकार्याने भाजपचे बाळाराम कांबरी उपसभापती झाले. भिवंडीत भाजपचे १९, सेनेचे १९, काँग्रेसचे २ व मनसेचा १ सदस्य आहे. येथे सेनेने काँग्रेसऐवजी भाजपला बरोबर घेतले. तसेच उपसभापतिपद भाजपला बहाल केले. पारनेरमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांना थेट पवारांच्या बारामतीतच प्रवेश दिल्याने सेनेने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. नगरविकास विभागाचे मंत्री आहेत. शिवसेनेचे विधिमंडळ नेते असलेले शिंदे यांच्या पक्षातील हालचाली मंदावल्याने सेना-भाजप जवळीकचे नवे अर्थ काढले जात आहेत.

पारनेर प्रकरणाची तात्कालिक प्रतिक्रिया

शहापूर पंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. सभापती व उपसभापतिपद शिवसेनेकडे आहे. मुरबाडमध्ये भाजपचे ११ आणि सेनेचे ५ सदस्य आहेत. भाजपचे एकहाती सत्ता येत असताना येथे शिवसेनेला उपसभापतिपद बहाल केले. राज्यस्तरीय आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादी कायम स्वतंत्र निर्णय घेत आली आहे. मात्र शिवसेना स्थानिक पातळीवरसुद्धा आघाडी असावी, अशा मताची आहे. हे धोरण उद्धव ठाकरे यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. ठाण्यातील शिवसेना-भाजप जवळीक ही पारनेर प्रकरणाची तात्कालिक प्रतिक्रिया असल्याचे मानले जात आहे. मात्र शिवसेनेचे बाहुबली नेते एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात हे घडल्याने राष्ट्रवादीचे नेते या नव्या मैत्रीकडे गंभीरपणे पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...