आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविआ सरकारचा निर्णय:नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव, नावाला शिवसेनेचा विरोध नव्हता - मुख्यमंत्री

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला अखेर दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. मातोश्रीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दि. बा. पाटील यांच्या नावाला, आपला कसलाही विरोध नसल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा चर्चेत आणि वादात होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मवाळ भूमिका घेत या नामकरणास मंजुरी दिल्याची शक्यता नाकारता येत नाही.

नेमके प्रकरण काय?
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार होते. राज्य सरकारने तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र, या निर्णायाला विरोध करत स्थानिकांनी दि. बा. पाटील याचे नावे देण्याची मागणी केली. त्यासाठी स्थापन झालेल्या कृती समितीने मानवी साखळी करून आंदोलन केले.

कोण आहेत दि. बा.?
दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष होते. महाराष्ट्रातल्या पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे 4 वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार पदही त्यांनी भूषवले. 'सिडको' त्याकाळी नवी मुंबईची बांधणी करत होती. तेव्हा पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. जासई येथील संघर्षात पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या पाठिमागे उभे राहिले. पोलिसांच्या काठा खाल्ल्या. अनेकदा तुरुंगवास भोगला.

भाषणांनी विधिमंडळ गाजवले
दि. बा. पाटलांनी विधिमंडळ गाजवले. त्यांची भाषणे अतिशय अभ्यासपूर्ण असत. ते भाषणाला उभे राहिले म्हणजे सभागृहात चिडीचूप शांतता असायची. शेतकरी कामकरी पक्षाला त्यांनी मोठे केले. ते पाचवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार राहिले. 16 ऑगस्ट 1999 रोजी दि. बा. पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, 1999 साली त्यांना पराभव पत्करावा लागला. 24 जून 2013 मध्ये दि. बा. पाटलांचे निधन झाले.