आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नवनियुक्त कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष हे शुक्रवारी 12 फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथील कार्यक्रमात महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार स्वीकारणार आहेत.
तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष 12 तारखेला सकाळी मंत्रालयाजवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना वंदन करतील. नंतर दक्षिण मुंबई व विधानभवनातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ट्रॅक्टरने प्रवास करुन गिरगाव चौपाटीला पोहचतील. तेथील लोकमान्य टिळक व सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर इंधन दरवाढ व वाढती महागाई या ज्वलंत प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गिरगाव चौपटी ते ऑगस्ट क्रांती मैदान हा प्रवास ते बैलगाडीने करतील.
माजी प्रांताध्यक्ष, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, मंत्रीमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेसचे आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व सेल आणि फ्रंटलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी 11 फेब्रुवारीला नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुंबईतील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेट देणार आहेत. सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी, माहिम दर्गा, माहिम चर्च, शिवाजी पार्क, दादर गुरुद्वारा येथे जाऊन अभिवादन करतील. तसेच महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.