आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मास्क हीच खरी लस:गरज पडल्यास राज्यात नाइट कर्फ्यू; सायंकाळी 6 ते सकाळी 9 पर्यंत संचारबंदीचा विचार : वडेट्टीवार

नागपूर, कोल्हापूर, मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. शनिवारी सीएसएमटी स्थानकावर तपासणी करताना एक कर्मचारी. - Divya Marathi
मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. शनिवारी सीएसएमटी स्थानकावर तपासणी करताना एक कर्मचारी.
  • सीमेवर कर्नाटक सरकारची नाकेबंदी

राज्यात दिवसेंदिवस कोरोना पुन्हा उग्र रूप धारण करीत असून शनिवारी ६ हजारांवर नवे रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कर्नाटक सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पुन्हा नाकेबंदी सुरू केली आहे. महाराष्ट्रातून ये-जा करणाऱ्या सर्व वाहनधारकांना चेक पोस्टवरून तपासणी करून पुढे सोडले जात आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते म्हणाले, साधारणत: सायंकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत हा नाइट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू आहे. यानंतरही लोकांनी काळजी घेतली नाही तर राज्यात पुन्हा लाॅकडाऊन करावे लागेल. त्याशिवाय पर्याय राहणार नाही. संपूर्ण राज्यभर एकदमच रात्रीची संचारबंदी लावण्यात येणार नाही. यासंबंधीचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. स्थानिक परिस्थिती पाहून ते निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

कार्यालयीन वेळांचे नियोजन, धोरण आखावे : उद्धव ठाकरे
कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीती आयोगाच्या बैठकीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मराठवाड्यात ४३१ नवे रुग्ण; ७ मृत्यू
मराठवाड्यात शनिवारी एकूण ४३१ नवे रुग्ण आढळले असून ७ बाधितांचा मृत्यू झाला. सर्वाधिक १४४ नवे रुग्ण औरंगाबादेत आढळले. जालन्यात ७० रुग्ण व सर्वाधिक ३ जणांचा मृत्यू झाला. हिंगोली २७, लातूर २६, नांदेड ५६, उस्मानाबादेत १९, बीड ५८ आणि परभणीत ३१ रुग्ण आढळले. औरंगाबादेत २ तर बीड आणि परभणीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

पश्चिम विदर्भात कोरोनाचे एकाच दिवसात १६ बळी, तर १३८० नवे रुग्ण
अमरावती | पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात कोरोनाने थैमान घातले असून शनिवारी दिवसभरात तब्बल १६ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर १३८० नवे रुग्ण आढळले आहेत. मृतांमध्ये अमरावती ७, तर अकोला ४, बुलडाणा ३ आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ७२७, तर बुलडाणा २१५, अकोला २००, यवतमाळ १४५ आणि वाशीम जिल्ह्यात ९३ नवे रुग्ण आढळले आहेत.

काेगनोळी सीमेवर थर्मल स्क्रीनिंग सुरू
कोल्हापूर | कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर शनिवारपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनधारक आणि नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग सुरू झाले. देशभरातील कोरोना रुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्ण अधिक आढळून आले आहेत. याच धास्तीमुळेच कर्नाटक सरकारने सीमेवर पुन्हा कोरोना चेक पोस्ट सुरू केले आहेत. तपासणीशिवाय राज्यात प्रवेश देऊ नका, अशा सूचना तहसीलदारांच्या यंत्रणेला दिल्या आहेत. शनिवार दुपारपासून आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिसांकडून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवली जात आहे.