आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी धडक दिली होती. संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पवारांच्या घराच्या दिशेने दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेवर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार महाराष्ट्राचे आक्रमक नेते समजले जातात, ते इतके आक्रमक आहेत की काल शरद पवारांच्या घरा बाहेर भानगड झाली तरी मुंबईत येण्याची त्यांच्यात हिंम्मत नव्हती, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
निलेश राणे यांनी टि्वट करून 'आज परळ डेपोजवळ एक एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, याला जबाबदार कोण??? शरद पवारांनी घराबाहेर येऊन एसटी कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न का केला नाही?? सुप्रिया सुळे म्हणत होत्या मी बसायला तयार आहे पण निघून गेल्या. एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार', असे म्हटलं.
एकही काच फुटली नाही किंवा घराचं नुकसान झालं नाही तरी राज्याचे गृहमंत्री आणि ॲडिशनल CP पवार साहेबांच्या घरी पोहोचले. पोलीस अधिकारी घरात जाऊन तपासा बद्दल माहिती देण्यासाठी पवार कुटुंबाने महाराष्ट्राला विकत घेतला आहे का? पवारांना इनामात ब्रिटिश सोडून गेले की महात्मा गांधी?, असा सवाल करत त्यांनी पवार कुटुंबार हल्लाबोल केला.
सुप्रिया सुळेंनी केला आंदोलकांचा सामना -
'सिल्व्हर ओक' वर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी धडक दिल्यानंतर शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकवर दाखल झाल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांना एसटी कर्मचाऱ्यांशी शांततेच्या मार्गाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कर्मचाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना घेराव घातला होता. घरात माझी आई आणि मुलगी आहे. अशी माहिती देखील सुप्रिया यांनी दिली होती. यावेळी त्यांनाही धक्काबुक्की झाली. एकंदरित काल सुप्रिया यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
सिल्व्हर ओक हल्ल्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया -
एसटी आंदोलकांनी हल्ला केल्यानंतर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. 'मला आश्चर्य वाटत की दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलन यशस्वी झाले म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्वर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता. हे पोलिस यंत्रणेचे अपयश आहे. पोलिसांना हे आधी कसे कळले नाही. तिथे जाणारे आंदोलक मीडियाला घेऊन पोहचले. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणे. मग मीडियाला जे कळलं ते पोलिस यंत्रणेला का कळलं नाही', असे म्हणते अजित पवारांनी पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.