आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

‘निसर्ग’ चक्रीवादळ:मुंबई वाचली, आता उत्तर महाराष्ट्रावर स्वारी; हाय अलर्ट कायम, अनेक ठिकाणी जोरदार वारे, पाऊसही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 6 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्राच्या किनाऱ्याला जबरदस्त तडाखा देत निसर्ग वादळ बुधवारी अलिबागजवळ किनाऱ्यावर धडकले. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी होता. कोकण आणि अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. अलिबागजवळ विजेचा खांब पडून एक जण ठार झाला. मुंबईत पत्र्याचे शेड अंगावर पडून तीन जण जखमी झाले. वादळाने मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब व होर्डिंग कोसळले. वाऱ्याचा वेग इतका होता की काही ठिकाणी मोटारसायकलीही रस्त्यावर घसरताना दिसल्या. छतावरील पत्रे पत्त्यांप्रमाणे उडाले. अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळ दुपारी १२.३० वाजता मुंबईपासून ९५ किमी अंतरावर अलिबागच्या किनाऱ्यावर धडकले. वादळाचा सर्वात मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला. रायगड जिल्ह्यात वादळामुळे मोबाइल सेवा खंडित झाली होती. वादळाने दिशा बदलल्याने मुंबई वाचली. मुंबईत जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांनाही वादळाचा फटका बसला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाऱ्यांचा वेग कमी झाला. गुजरातच्या किनाऱ्याला फारसे नुकसान झाले नाही. वादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले असून ते उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत हाय अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

वादळाचा परिणाम : राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार वारे, पाऊसही

- अलिबागजवळच्या उमाटे गावात वादळाने ५८ वर्षीय व्यक्तीचा विजेचे ट्रान्सफार्मर अंगावर पडल्याने मृत्यू झाला.

- पुणे जिल्ह्यात वादळाने दोघांचा बळी घेतला, तर ३ जण जखमी झाले. वाहेगाव येथे घराची भिंत अंगावर पडल्याने मंजाबाई अनंत नवले (६५) यांचा मृत्यू झाला. कुटुंबातीलच तिघे जखमी झाले.

- मोकरवाडी (ता. हवेली) येथे वादळी वाऱ्याने घरावरील उडती पत्रे पकडण्याच्या प्रयत्नात गंभीर दुखापत होऊन प्रकाश मोकर (५२) यांचा मृत्यू झाला.

प. महाराष्ट्र : सांगली, कोल्हापुरात पाऊस

सांगली | वादळ २० किमी वेगाने प्रवास करत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत धडकले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम पावसाने हजेरी लावली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’ होता.

नाशिक : सप्तशृंग गड मार्गावर दरड कोसळली

नाशिक | सप्तशृंग गड मार्गावर एका ठिकाणी दरड कोसळली. जिल्हाभरात बुधवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. अनेक ठिकाणी झाडे पडली.

पुणे : ३० हून अधिक ठिकाणी झाडे कोसळली, वाहनांचे प्रचंड नुकसान

पुणे | पुण्यात मंगळवारी रात्रभर आणि बुधवारी संततधार होती. बुधवारी शहर आणि परिसरात झाडपडीच्या ३० हून अधिक घटना घडल्या. उद्यान अधीक्षक दत्तात्रेय गायकवाड म्हणाले,‘पुण्यात बुधवारी येरवडा, कोथरूड, कोरेगाव पार्क, विमाननगर, कल्याणीनगर, वडगाव शेरी, स्वारगेट, कात्रज अशा परिसरांत झाडे पडल्याने काही वाहनांचे नुकसान झाले.

मराठवाड्यात पावसापेक्षाही वाऱ्याचाच जोर, औरंगाबादेतही ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे

औरंगाबाद | वादळामुळे मराठवाड्यातीलही हवा पालटली. मराठवाड्यात जालना, औरंगाबाद व लातूर जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला असला तरी हवेचा वेग जास्त होता. हवामान विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहत होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली आहेत. तसेच विद्युत तारांवर झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी आणि बीड जिल्ह्यांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते,तर जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा आणि हवेचा जोर वाढला होता.

- यामुळे पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहतील. तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

- बुधवारी रात्री उशिरा हे वादळ पुण्याच्या वायव्येला ५० किमी तर मुंबईच्या पूर्वेला ९० किमीवर होते. तत्पूर्वी हे वादळ धुळे, नंदूरबार मार्गे जाईल, असे आयएमडीने म्हटले होते.

वादळ पुणे जिल्ह्यातून येवला मार्गे उत्तरेकडे

- हवामान विभागाच्या अंदाजानुसार, निसर्ग वादळाचे मार्गक्रमण आता पुणे जिल्ह्यांतून नगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यातून उत्तरेकडे होईल. पुण्यातील जुन्नर, नंतर संगमनेरजवळून, येवला, चाळिसगाव जवळून ते जळगाव मार्गे उत्तरेकडे जाईल.

राज्यात 6 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

- कुलाबा वेधशाळेने पालघर, नाशिक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला. २४ तासांत या जिल्ह्यांत ६४.५ ते ११५.५ मिमी पावसाची शक्यता आहे.

- नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व पालघर जिल्ह्यांत ४ आणि ५ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात पुराचा इशारा देण्यात आला आहे.

४ जून : कोकण-मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह, तर मराठवाड्यात मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता.

५ जून : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

६ जून : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस होईल.

आजपासून प्रभाव कमी होत जाणार

चक्रीवादळाने बुधवारी दुपारी एकच्या सुमारास जमीनस्पर्श केला. त्या प्रभावामुळे पुणे व परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे होते. ४ जूननंतर चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल. - डॉ. अनुपम कश्यप, आयएमडी प्रमुख, पुणे

मुंबईकरांचा जीव भांड्यात

- मुंबईकडे मोर्चा वळवण्याआधीच वादळ उत्तरेकडे वळले. यामुळे मोठी हानी टळली. मुंबई आणि परिसरात सोसाट्याचा वाऱ्यासह दोन तास अतिवृष्टी झाली. शहरात वृक्ष उन्मळून पडले असून शाॅर्टसर्किटच्या घटना झाल्या आहेत.

- दुपारी ताशी ७३ किमी वेगाने मुंबईत वारे वाहत होते. त्यात ९ घरे पडली आहेत. शहरात ३९, पूर्व उपनगरात ४० आणि पश्चिम उपनगरात ३८ असे एकूण ११७ वृक्ष उन्मळून पडले आहेत.

- किनाऱ्याजवळच्या रहिवाशांनी तात्पुरते निवारे म्हणून ३५ शाळांत १८ हजार ८८७ नागरिकांनी आसरा घेतला.

- वांद्रेतील कोविड रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले. बंगळुरूहून आलेले एक मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले.

- किनारपट्टीवर राहणाऱ्या महाराष्ट्रातील आणि गुजरातेतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.

- एनडीआरएफचे मुख्य महासंचालक एस. एन. प्रधान यांच्या मते, एकूण एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले.

0