आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'निसर्ग' चक्रीवादळ:आता रायगड-पुण्यात 'निसर्ग' चक्रीवादळाचा प्रभाव, विविध घटनांत दोघांचा मृत्यू; 6 तासात वाऱ्याचा वेग सुमारे 60 किमी पर्यंत कमी झाला

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 4 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, नाशिकला पुराचा इशारा

अरबी समुद्रात उठलेले 'निसर्ग' चक्रीवादळ आता रायगड व पुण्यातून जात आहे. दुपारी 12.30 वाजता ते अलिबागच्या किनारपट्टीवर धडकले होते. तेव्हा हवेचा वेग 120 किलोमीटर प्रति तास होता. मुंबईवर होणाऱ्या परिणांमामुळे पाऊस पडला, झाडे उन्मळून पडली आणि घरांची छप्परं उडून गेली. जितक्या नुकसानाची शक्यता वर्तवली तेवढे नुकसान झाले नाही. 63.30 वाजता हे वादळ रायगड आणि पुण्यात पोहोचले. यावेळी हवेच्या वेगात सुमारे 60 किलोमीटर प्रति तास पेक्षा घट झाली. पुढील काही तासांत निसर्ग चक्रीवादळ आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. 

रायगडमध्ये विजेचा खांब पडल्याने आणि पुण्यात भिंत पडल्याने एक-एक व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत. 

वादळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीतय विमानतळावर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत विमानांची ये- जा थांबवण्यात आली आहे. धावपट्टीवर मालवाहू विमान घसरले होते. यामुळे सावधगिरीच्या उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील 21 आणि गुजरातच्या 16 जिल्ह्यांमध्ये वादळाचा परिणाम झाला आहे. दोन्ही राज्यांत एनडीआरएफने एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. यादरम्यान मुंबईच्या वांद्रा-वरळी सी लिंकवरील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे गुजरातमधील द्वारकेच्या समुद्रात उंट लाटा उसळत आहेत. हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवरही धडकणार होते, पण हवामान खात्याने नंतर हा अंदाज मागे घेतला.

अपडेट्स

  • या वादळामुळे दक्षिण मुंबईतील निवासी इमारतीवरील शेड उडाले. मरीन ड्राईव्हजवळ सीबीआय लेनवर झाड कोसळले, यामुळे टॅक्सीचे नुकसान झाले आहे.
  • हवामान खात्याचे (कुलाबा) उपसंचालक कुशनानंद होसाळीकर यांनी सांगितले की, वादळाने अलिबागला धडक दिली तेव्हा तेथे 125 किमी वेगाने वारे वाहत होते. हे वादळ रायगड ओलांडून मुंबई आणि ठाण्याकडे वळले आहे. या वादळाचा परिणाम सुमारे 3 तास राहणार आहे.
  • निसर्ग वादळात एक जहाज अडकले आणि रत्नागिरीतील भाटिमिर्या किनाऱ्यावर पोहोचले.
  • मुंबईच्या ससून डॉक परिसरात वादळ येण्यापूर्वी समुद्र अत्यंत खवळलेला दिसून आला. हा मच्छिमारांची परिसर असल्यामुळे पोलिस दुचाकीवर गस्त घालत लोकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचे निर्देश देत आहेत.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिवृष्टीच्या वेळी लोकांना विनाकारण घर न सोडण्याचा सल्ला दिला आहे.
  • कारमधून बाहेर पडताना हातोडा किंवा एखादे अवजड साधन ठेवा, जेणेकरुन कार पाण्यात अडकून त्याचे सेंट्रल लॉक जाम झाले तर काच फोडून बाहेर पडता येईल.
  • वादळाआधी, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गावांतून 21 हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. जिल्ह्यातील सर्व उद्योग व बाजारपेठा बंद केल्या होत्या. मच्छीमारांना 4 जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असे सांगण्यात आले.
  • वादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिमी नौदल कमांडने आपल्या सर्व पथकांना सतर्क केले. नौदलाने 5 पूर टीम आणि 3 डायव्हर्स टीम मुंबईत सज्ज ठेवले आहेत.

प्रश्न-उत्तरात निसर्ग वादळाला समजून घ्या

वादळ कोठे तयार झाले?

हे वादळ 1 जून रोजी अरबी समुद्राच्या मध्य-पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, त्यानंतर त्याचे वादळात रुपांतर झाले. हे कमी दाबाचे क्षेत्र मुंबईपासून 630 किमी दक्षिण-पश्चिमेस होते.

येथे कधी आणि केव्हा धडकले?

राज्यातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग भागात दुपारी 1 वाजत हे वादळ धडकण्यास सुरूवात झाली. येथून जाण्यासाठी वादळाला तीन तास लागले. 

याचा परिणाम काय होत आहे?

वादळामुळे मुंबई आणि गोव्यात पाऊस पडत आहे. बुधवारी मुंबईत 27 सेमी पेक्षा अधिक पाऊस होण्याच अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्रात 2 मीटर उंच लाटा उसळत आहेत. वादळग्रस्त जिल्ह्यांमध्ये वीज व पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला. दक्षिण गुजरातच्या वलसाड, नवसारी, सुरत व्यतिरिक्त दमन, दादरा आणि नगर हवेलीत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. मध्यप्रदेशातील भोपाळ, उज्जैन, इंदूर, ग्वाल्हेरच्या काही जिल्हे आणि शहरांत मुसळधार किंवा अतिवृष्टीचा धोका आहे. 

यामुळे काय नुकसान होऊ शकते?

पालघरमध्ये देशाताली सर्वात जुने तारापुर औष्णिक वीजकेंद्र आहे. मुंबईत बार्क (भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर) आहे. वादळामुळे यांना नुकसान पोहचले तर वीजप्रवास खंडीत होऊ शकतो. रायगडमध्ये देखील वीज, पेट्रोलियम केमिकल्स आणि इतर महत्वाच्या इंडस्ट्रीज आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि नेव्ही ही मुंबईतील महत्वाची मोक्याची जागा आहे. वादळामुळे यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. 

राज्यात 4 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, नाशिकला पुराचा इशारा

हवामान खात्यानुसार, महाराष्ट्रात ४ जूनपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोव्याची राजधानी पणजीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मुंबई आणि सुरतसह दोन्ही राज्यांतील ११ जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे.

तयारी : गुजरात-महाराष्ट्रात एनडीआरएफची ३३ पथके तैनात, मुंबईत जमावबंदी

निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि गुजरातेत एनडीआरएफची ३३ पथके पाठवण्यात आली आहेत. यापैकी ११ पथके राखीव आहेत. महाराष्ट्रात १६ तर गुजरातेत १७ पथके तैनात केली आहेत.

अणुऊर्जा प्रकल्पामुळे चिंता : ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, चक्रीवादळाच्या मार्गावर रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील अणुऊर्जा प्रकल्प तसेच रसायनाचे कारखाने आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद होण्याचा धोका आहे.

१ ते २ मीटर उंचीच्या लाटांची शक्यता

मुंबई, रायगड,ठाणे जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर १ ते २ मीटरपर्यंत लाटा उसळू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या वादळात वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी राहील, प्रसंगी तो ताशी १२० किमीपर्यंत जाण्याची शक्यताही आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील.

मान्सूनच्या प्रगतीला अनुकूल स्थिती

एक जून रोजी केरळात दाखल झालेला मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. पुढील २४ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा काही भाग ते पुद्दुचेरीपर्यंत वाटचाल करण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ धडकले तर १०९ वर्षांनंतर मुंबईला बसेल फटका, हाय अलर्ट जारी

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.

- गुजरातच्या किनाऱ्यालगतच्या गावांतून २० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

- राज्यात एनडीआरएफच्या १० तुकड्या तैनात, तर ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

- ज्या जिल्ह्यांना फटका बसण्याची शक्यता आहे, तेथील वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा बंद करण्याची तयारी करण्यात आली आहे.

- नौदलाने मुंबईत ५ फ्लड रेस्क्यू पथके आणि ३ पाणबुड्यांची पथके तैनात केली आहेत. मुंबई, गोवा, पोरबंदरच्या नौदल हवाई स्टेशनवर नौदलाची डोर्निअर विमाने आणि हेलिकॉप्टरसह इतर यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

रेड अलर्ट

- ३ जूनसाठी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे या जिल्ह्यांत रेड अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे या जिल्ह्यांत २०४.४ मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

ऑरेंज अलर्ट

- तीन जूनसाठी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव,अहमदनगर या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे या जिल्ह्यांत ११५.६ ते २०४ मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे.

यलो अलर्ट

- तीन जूनसाठी राज्यातील औरंगाबाद, जालना, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे या जिल्ह्यांत ६४.५ ते ११५ मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांत ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच तेथे १५.६ ते ६४ मिमीपर्यंत पाऊस पडू शकतो. नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत पुराचा इशारा आहे.

बातम्या आणखी आहेत...