आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आणखी एक भूकंप होणार आहे. संजय राऊत 10 जून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
राज्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालींवरुन गेल्या काही दिवसात मोठे राजकीय भूकंप घडणार असल्याचे वक्तव्य अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात आले होते. यातील एक म्हणजे राष्ट्रवादीतील नेतृत्व बदलाचे संकेत आणि पुन्हा जैसे थे झालेली परिस्थिती यावरुन एक राजकीय उलाथापालथ घडून गेली आहे. आता नीतेश राणेंच्या या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
अजित पवारांनी पक्ष सोडल्यास...
संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार हे नक्की त्यांच्या त्याबाबत बैठकाही सुरु आहेत. माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी संजय राऊतची भूमिका पाहिली असता हे लक्षात येते. अजित पवारांनी पक्ष सोडल्यास मी लगेच पक्ष प्रवेश करतो ही राऊतांची भूमिका आहे. त्यामुळे राऊत सातत्याने अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत आहे.
मला राष्ट्रवादीत घ्या
नीतेश राणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होईल. संजय राऊतने राष्ट्रवादीत असे कळवले आहे की सांगितले, आता उद्धव ठाकरेंकडे पक्ष नाही, त्यांचे काही खरे नाही, ते मला पुन्हा खासदार करु शकत नाही. मला राष्ट्रवादीत घ्या. उद्धव ठाकरेंबरोबर राहण्यात रस नाही.
संजय राऊत सिल्व्हर ओकवर गेले
नीतेश राणे म्हणाले, पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर संजय राऊतला बसायचे होते. त्यासाठी ते सातत्याने शरद पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे 4 वाजता संजय राऊत सिल्व्हर ओकवर गेले. उद्धव ठाकरे सापाला दूध पाजत आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर यांचे मनसुबे कळतील.
ठाकरेंना एकटे पाडण्याचे षडयंत्र
नीतेश राणे म्हणाले, शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा देशभरातल्या नेत्यांनी त्यांना फोन केले. मात्र उद्धव ठाकरेंनी पवारांना फोन केला नाही. यापाठिमागे संजय राऊत आहेत जे ठाकरे-पवार भेट होऊ देत नाही. उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्यासाठी राऊत हे षडयंत्र करत आहे. राऊत स्वतः चारचार वेळा जाऊन त्यांना भेटतो.
जनतेचा पैसा पाण्यात नाही गेला का?
नीतेश राणे म्हणाले, संजय राऊत बेळगावात जाऊन भाजपवर टीका करतो. आजच्या रोखठोकमध्ये मोदींवर टीका केली आहे. कर्नाटक निवडणुकीत मोदींनी सरकारी पैसा वापरल्याचे हे म्हणत असेल तर 'मविआ'चे सरकार असताना आदित्य ठाकरे डावोसला एकटा गेला नव्हता. संमेलनानंतर काही दिवस तिथे राहिले. वरुण सरदेसाई त्याच्यासोबत होते. बॉलिवूडचे मित्र-मैत्रिण सोबत होते. त्यांच्या हॉटेलचा, राहण्या-फिरण्याचा खर्च कोणी केला? मग हा जनतेचा पैसा पाण्यात नाही गेला का, असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
नीतेश राणे म्हणाले, हिंदूंच्या विरोधी भूमिका, सत्यपाल मलिक यांना भेटले त्यांच्या पाया पडले. संजय राऊतांना हिंदूत्वाची अॅलर्जी. बीएमसी निवडणुका आल्यावर ठाकरे मराठी माणसावर बोलतात. राऊतांना केरला स्टोरीज आवडत नाही तर लवकरच दिशा सालियान फाईल्स ओटीटीवर येईल. उद्धव ठाकरेंच्या जोरावर मुंबई बंद करुन दाखवा. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कातळशिल्प दिसले नाही का? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.