आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे.
संसदिय मंडळातून हटवले
विशेष म्हणजे भाजपने ऑगस्टमध्येच आपल्या संसदीय मंडळात बदल केले होते. पक्षाच्या अतिशय महत्त्वाच्या अशा या मंडळातून नितीन गडकरी यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर पक्षाकडून नितीन गडकरींना साईडलाईन केले जात आहे, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता पुन्हा नितीन गडकरींचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
गुजरातमध्ये भाजपचा जोर
गुजरातमध्ये पुढील महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. गेल्या 27 वर्षांपासून या राज्यात भाजप सत्तेवर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुळे भाजपला विधानसभेत 100 आमदारांचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे यंदा जोरदार बहुमत मिळवण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यानिमित्तानेच या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीसांचाही समावेश
स्टार प्रचारकांच्या यादीत नितीन गडकरींसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे संसदीय मंडळातून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही हटवण्यात आले होते. त्यांचादेखील समावेश स्टार प्रचारकांमध्ये करण्यात आला आहे. तसेच, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह 40 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
चर्चा गडकरींच्या वक्तव्यांची
संसदीय मंडळातून डच्चू मिळाल्यानंतर नितीन गडकरींच्या काही वक्तव्यांची चांगलीच चर्चा झाली. पुढील निवडणुकीत मी प्रचार करणार नाही, आताचे राजकारण पाहता सन्यास घ्यावा वाटतो, अशी काही वक्तव्ये करुन नितीन गडकरींनी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरींना डावलले जात असल्याची चर्चा झाली. तसेच, काही दिवसांपुर्वीही गडकरींनी काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे कौतुक केले. मनमोहन सिंह यांनी देशाला ज्या आर्थिक स्थितीत आणले, त्याबद्दल देश त्यांचे आभारी राहील, असे वक्तव्य गडकरींनी केले होते. एकीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन तसेच काही प्रमुख भाजप नेते आर्थिक नितींवरुन मनमोहन सिंह यांच्यावर टीका करत असताना गडकरींच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले गेले.
गुजरातकडे राहुल गांधींची पाठ
दरम्यान, गुजरातमध्ये निवडणुकीचे ढोल वाजण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेऊन परतले. परंतु काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी अद्यापही येथे सभा किंवा रोड-शो घेतला नाही. सामान्यपणे गुजरातमध्ये राजकीय लढाई मोदी व राहुल यांच्या होते. त्यात भाजपला लाभ होतो. म्हणूनच अशा लढाईपासून राहुल यांना गुजरात निवडणुकीपासून दूर ठेवण्यात आले आहे. काँग्रेस निष्क्रिय नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.