आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशन:राज्यात कुपोषणामुळे एकाही बालकाचा मृत्यू नाही : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कुपोषणामुळे एकही बालमृत्यू झालेला नाही, या आपल्या उत्तरावर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गुरुवारी (२५ ऑगस्ट) विधानसभेत पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली. त्यामुळे विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला. मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने हे उत्तर असंवेदनशील असल्याचा आरोप करीत सभात्याग करत त्याला विरोध दर्शवला.

राज्यातील आदिवासी जिल्ह्यातील बालक आणि माता यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नवसंजीवनी योजना सुरु करण्याबाबत आमदार कुणाल पाटील यांनी बुधवारी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी दिलेल्या उत्तरात डॉ. विजयकुमार गावित यांनी राज्यात कुपोषणामुळे एकही बालमृत्यू न झाल्याचे उत्तर दिले होते. या उत्तरावर आक्षेप घेत विरोधकांनी हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी बुधवारी केली होती. त्यामुळे गुरुवारी विधानसभेत पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळीही डॉ. विजयकुमार गावित हे आपल्या उत्तरावर ठाम राहिले. राज्यात कुपोषणामुळे एकही बालमृत्यू झालेला नसून रोगप्रतिकारक्षमता कमी असल्याने हे मृत्यू झाल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.

आदिवासी मंत्र्यांच्या या उत्तरावर आक्षेप घेत विरोधकांनी त्यांना धारेवर धरले. राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य मंत्र्यांकडे प्रश्न ढकलत आहेत, असा विरोधकांनी आरोप केला. योग्य उत्तर सभागृहात दिले जात नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही.

आदित्य ठाकरे-मंत्री मुनगंटीवार यांच्यात जुंपली कुपोषणाने बालमृत्यू या प्रश्नावर चर्चा सुरू असताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी एका असंसदीय शब्दाचा वापर केल्याचा आरोप वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. त्यामुळे हा शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली.

अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे भरणार : मंत्री संदिपान भुमरे राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त असणाऱ्या जवळपास ७५ हजार जागा लवकरच भरल्या जाणार असून या भरती प्रक्रियेतून अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरली जाणार असल्याची माहिती मंत्री संदिपान भुमरे यांनी गुरुवारी (ता.२५) विधानसभेत दिली. तर अल्पसंख्याक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ३१ योजनांमध्ये निधी खर्च न झाल्याप्रकरणी लवकरच चौकशी केली जाईल, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.

शहर रस्ते विकासासाठी जळगावला निधी : उपमुख्यमंत्री जळगाव शहरातील रस्ते विकासासाठी प्रस्ताव प्राप्त होताच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य सुरेश भोळे यांनी आज विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री म्हणाले की, जळगाव शहरातील रस्ते विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ३८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

आदिवासींच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या सर्व योजना कालबद्ध पद्धतीने प्रभावीपणे राबवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. आरोग्यमंत्री प्रा. सावंत म्हणाले, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या अतिदुर्गम आदिवासी पट्ट्यामध्ये मूलभूत सोयी-सुविधांच्या बळकटीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन या भागातील बालविवाह रोखणे, यासह अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबवणार आहोत.

वाशिम जिल्ह्यातील खापरदरी ते सावरगाव कान्होबा येथील नादुरुस्त रस्ता विशेष दुरुस्तीअंतर्गत निधी उपलब्ध करून त्याचे काम प्राधान्याने करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली. महाजन म्हणाले, सावरगाव ते खापरदरी हा ग्रामीण रस्ता ४.२० किलोमीटर लांबीचा आहे. रस्त्याची व पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असून, विशेष बाब म्हणून दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून या रस्त्याची आणि पुलाची दुरुस्ती करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...